Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडात (Shraddha Walkar Murder Case) दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आरोपी आफताबनं (Aftab Poonawalla) श्रद्धाची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. याचवर्षी मे महिन्यात आफताबनं श्रद्धाची हत्या (Shraddha Walkar) करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर एक-एक करुन त्यानं छतरपूरच्या जंगलात आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांत ते तुकडे फेकून दिले होते. दिल्लीत घडलेल्या या निर्घुण हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला आहे. पण यापूर्वीही देशात अशा भयावह घटना घडल्या आहेत. या घटनांबाबत आजही काही ऐकलं तर अंगावर काटा येतो. जाणून घेऊया क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या देशातील अशा काही हत्याकांडांबाबत...
ओदिशा हत्याकांड : जून, 2013
जून 2013 मध्ये, रागाच्या भरात एका रिटायर्ड लेफ्टिनेंट कर्नलनं पत्नीची हत्या केली होती. भुवनेश्वर येथे राहत्या घरी रिटायर्ड लेफ्टिनेंट कर्नल सोमनाथ परीदा यांनी पत्नी उषाश्री स्टील टॉर्चनं हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 300 तुकडे केले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्यारांनी पत्नीच्या मृतदेहाचे 6-6 इंचाचे तुकडे केले आणि 22 टिफिनमध्ये पॅक केले. दुर्गंध पसरू नये यासाठी त्यावर फिनाइलही ओतलं.
सातत्यानं फोन केल्यानंतरही बहिण काहीच प्रतिसाद देन नव्हती, त्यामुळे उषाश्री यांचा भाऊ काही नातेवाईकांसह बहिणीची विचारपूस करण्यासाठी भुवनेश्वरला आला. त्यावेळी त्यांनी दरवाजा वाजवला कोणीच दरवाजा उघडला नाही. नातेवाईकांनी खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना दुर्गंध आला. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याच्या संशयातून नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर रिटायर्ड लेफ्टिनेंट कर्नल सोमनाथ परीदा यांना ताब्यात घेण्यात आलं. न्यायालयानं त्यांना याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अनुपमा गुलाटी हत्याकांड : 17 ऑक्टोबर 2010
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबचा फोन ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याचा सीडीआर रिपोर्ट काढला. तसेच, त्याच्या फोनची हिस्ट्रीदेखील पाहिली. त्यावेळी पोलिसांना एक धक्कादायक माहिती समोर आली. श्रद्धाची हत्या करण्यापूर्वी आफताबनं अनुपमा गुलाटी हत्याकांडाबाबत गुगलवर सर्च केलं होतं. अनुपमाचे पती राजेश गुलाटीनंही तिची निर्घूण हत्या केली होती. त्यावेळी राजेशनं तिच्या मृतदेहाचे एक दोन नाही, तर 72 तुकडे केले होते. त्यानंतर ते सर्व तुकडे त्यानं डीप फ्रीजरमध्ये ठेवले होते. अनुपमाच्या भावानं अनुपमाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्याशी त्याचा काहीच संपर्क झाला नाही. त्यावेळी अनुपमाचा भाऊ सूरज दिल्लीहून देहरादूनमध्ये अनुपमाला भेटण्यासाठी पोहोचला. त्यावेळी अनुपमाच्या हत्याकांडाचा खुलासा झाला.
अनुपमानं सॉफ्टवेअर इंजिनिअर राजेशसोबत प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, अनुपमा आणि राजेश गुलाटी यांच्यात वारंवार भांडणं होत होती. ज्या दिवशी अनुपमाची हत्या झाली, त्यादिवशीही दोघांमध्ये वाद झाले होते. भांडणामध्ये अनुपमाला राजेशनं धक्का दिला आणि तिचे डोके बेडच्या कोपऱ्यावर आपटलं. त्यानंतर राजेशनं अनुपमाच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला. हत्येवेळी गुलाटी दाम्पत्याची दोन्ही मुलं अवघ्या 4 वर्षांची होती. राजेश अजूनही तुरुंगात आहे.
नयना साहनी हत्या प्रकरण/तंदूर घटना : 2 जुलै 1995
माजी युवक काँग्रेस नेते सुशील यांना त्यांची पत्नी नयना फोनवर कोणाशीतरी बोलताना दिसली. सुशीलला पाहताच नैनानं फोन कट केला. पण, सुशीलनं तोच नंबर पुन्हा डायल केला. तर, दुसऱ्या बाजूला त्याचा वर्गमित्र करीम मतबूल बोलत होता. त्याचा आवाज ऐकून सुशील संतापला. त्यानं आपल्या पत्नीची हत्या केली. तो एवढ्यावर थांबला नाही, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं जे केलं ते ऐकूनच धडकी भरते. तर त्यानं स्वतःच्या रेस्टॉरंटच्या ओव्हनमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे जाळण्यास सुरुवात केली.
यामध्ये त्याच्या रेस्टॉरंट मॅनेजरही त्याला मदत करत होता. मृतदेह जळत असताना ओव्हनमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. ते पाहून रेस्टॉरंटच्या बाहेर भाजी विकणाऱ्या महिलेनं आरडाओरडा केला. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिकडे धाव घेतली आणि हा सर्वप्रकार उघडकीस आला. पोलीस आले तेव्हा नयनाचा मृतदेह जमीनीवर होरपळलेल्या अवस्थेत पडला होता.
बेलाराणी दत्ता हत्या प्रकरण : 31 जानेवारी 1954
कोलकात्यात एका सफाई कामगाराला टॉयलेटजवळ वर्तमानपत्रात गुंडाळलेले एक पॅकेट सापडलं. त्यावर रक्ताचे शिंतोडे होते पॅकेटमधून मानवाच्या हाताचं बोट बाहेर आलं होतं. त्यानं तात्काळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता, त्यातून धक्कादायक घटनेचा खुलासा झाला. बिरेन नावाच्या तरुणाचं बेलाराणी आणि मीरा नावाच्या महिलांशी संबंध होते. भेटायला उशीर झाला तर दोन्ही महिला त्याला प्रश्न विचारायच्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देता-देता बिरेन वैतागला होता.
अशातच बेलाराणीनं बिरेनला सांगितलं की, ती त्याच्यापासून गरोदर आहे. वैतागलेल्या बिरेनला हे ऐकून राग आला. रागाच्या भरात बिरेननं बेलाराणीची हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर बिरेननं ते तुकडे घराच्या कपाटात ठेवले आणि दोन दिवस घरातच झोपून राहिला. त्यानंतर बेलाराणीच्या मृतदेहाचे तुकडे शहराच्या विविध भागांत फेकून दिले. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बिरेनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.