ठाणे : भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरातील निर्जन स्थळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण (Kalyan) शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक 13 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता पासून बेपत्ता असल्याने पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. मात्र, मुलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
अपहरण झालेल्या मुलीचा शोध स्थानिक कल्याण पोलीस घेत असतानाच मंगळवारी सकाळी या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी आढळून आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून, तिच्यावर अत्याचार देखील केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी गंभीरपणे तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी मयत मुलीचे वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, खाऊ खाण्यासाठी मुलीने आईकडून पैसे घेऊन ती जवळील दुकानावर गेली होती. मात्र, तेव्हापासून ती बेपत्ता होती, तिला शोधण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती रात्रीपर्यंत काही मिळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. आज सकाळच्या सुमारास पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कल्याण भिवंडी सीमेवरील बाप गावचे हद्दीत या मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाच परिसरात राहणाऱ्या एका इसमावर मयत मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. कारण, या इसमाने जवळपास एक वर्षे आधी याच मुली बरोबर विनयभंग केला होता, तेंव्हा पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुन्हा याच मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मयत मुलीच्या वडिलांनी संबंधित इसमावर संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण घटनेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.