अमरावती : अमरावती(Amravati Crime) जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारुड्या मुलाला दारू पिण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने चक्क जन्मदात्या आईची हत्या (Murder) केली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी आईची हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी (Amravati Police)ताब्यात घेतले आहे. पवन जांबेकर असे या प्रकरणातील मारेकरी (Crime) मुलाचे नाव आहे, तर गंगाबाई मोतीलाल जांबेकर असे वयोवृद्ध मृत आईचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी पवनला ताब्यात घेत पुढील कायदेशील कारवाई सुरू केली आहे. 


अवघ्या शंभर रुपयांसाठी जन्मदात्या आईची हत्या


मेळघाटातील भोकरबर्डी येथील रहिवासी असलेल्या गंगाबाई मोतीलाल जांबेकर यांच्या बँकेच्या खात्यात पी एम किसान सन्मान योजनेचे पैसे आले असल्याची बाब मुलगा पवन जांबेकरला कळाली. पवनला दारूचे व्यसन असल्याने तो दारू पिण्यासाठी कायम आईचा पैशांसाठी छळ करत होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आई गंगाबाई त्याला कायम विरोध करत समजावत होती. मात्र तो दारूच्या आहारी गेल्याने यावरून त्यांच्यात कायम वाद होत राहिले. दरम्यान, बँकेत पैसे असून देखील आई पैसे देत नसल्याच्या रागातून पवनने आपल्या आईशी वाद घातला आणि पैशांसाठी बळजबरी केली. मात्र, आईने विरोध केला असता पवनचा राग अणावर झाला आणि संतापलेल्या पवनने घरातील काठीने आईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत असलेल्या पवनला आपल्या कृत्याची जाणीव देखील नव्हती. त्याने अवघ्या शंभर रुपयांसाठी आपल्या जन्मदात्या आईला मारहाण केली. यात आई गंभीररित्या जखमी झाली असून त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.


मारेकरी मुलाला अटक 


या हत्येच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या बाबत माहिती पोलिसांना दिली असता, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रकरणाची कायदेशीर कारवाई करत चौकशी केली असता मारेकरी पवनने आपल्या कृत्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र अवघ्या शंभर रुपयांसाठी जन्मदात्या आईचीच मुलाने हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या