Amravati Crime News : महाप्रसादाच्या निमित्ताने एका 23 वर्षीय तरुणीला तालुक्याच्या ठिकाणी आणले. मात्र, परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केला. त्यावर पीडितेने विरोध करताच आरोपींनी तिला जबर मारहाण देखील केली. ही खळबळजनक घटना अमरावती (Amravati Crime) जिल्ह्यातील मालखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी (Amravati Police) आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पाच जणांनी मिळून केला अत्याचार
या प्रकरणी महेश वाघमारे (वय 25), पिंटू हरले (वय 39), रमेश भलावी (वय 40), इस्माईल खाँ (वय 65), नितीन ठाकरे (वय 25) अशी या पाच संशयित आरोपींची नावे असून हे सर्व मालखेड येथील रहिवासी आहेत. यातील महेश वाघमारे हा पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या परिचित आहे. त्यामुळे तो लाही (प्रसाद) करिता मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून तो तिला मालखेड येथे घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडितेला रात्रभर आपल्या घरी ठेवले. 28 जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळगावी सोडून देण्यासाठी निघाला. महेशने तिला दुचाकीवर बसवले. मात्र, गावी न जाता त्याने गाडी शेताच्या दिशेने वळवली.
दरम्यान, शेतात असलेल्या एका खोलीत तरुणीला नेण्यात आले. त्यानंतर पिंटू हरले हा देखील घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर या दोघांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. या दरम्यान तिथं रमेश भलावी, इस्माईल खाँ आणि नितीन ठाकरे हे देखील आले आणि त्यांनीही तिच्यावर अतिप्रसंग केला. यावर पीडितीने आरडो ओरड करून विरोध केला. मात्र, शेतशिवाऱ्याजवळ कुणीही नसल्याने काहीच उपयोग झाली नाही. पीडित तरुणीने स्वत: विरोध केला असता तेव्हा तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारू अशी धमकी देखील देण्यात आली.
पाचही आरोपींना अटक
या थरारक घटनेनंतर पीडित तरुणीने कसेबसे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आणि त्यांनी लगेच शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस तक्रार दिली. या तक्रारीवरून 29 जानेवारीच्या रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध घेतला आणि काही तासांमध्येच पाचही आरोपींना अटक केले. या प्रकरणाचा सखोल तपास शेंदूर जनाघाट पोलीस करत आहेत. मात्र, या खळबळजनक घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.