Ambernath Shocking: एका नेपाळी गायिकेनं नेपाळी वॉचमनच्या बायकोला किडनी विकण्याचं आमिष दाखवत साडे आठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 महिन्यांनी पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. तर, मुख्य आरोपी असलेली नेपाळी गायिका अजूनही फरारच आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरुच आहे. 


मूळच्या नेपाळच्या असलेल्या कल्पना मगर या अंबरनाथला त्यांचे पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. त्यांचे पती एका बांधकामावर वॉचमन म्हणून काम करतात. तर कल्पना या धुणीभांडी करून त्यांच्या चार मुलांचं पालनपोषण करतात. कल्पना या नेपाळमध्ये असताना 2019 साली नेपाळी गायिका रुबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. 2020 साली त्या भारतात राहायला आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर रुबिना बादी यांना शोधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर रुबिना बादी यांच्याशी चॅटिंग करू लागल्यानंतर कल्पना यांनी तिला आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचं सांगितलं. त्यावर रुबिनाने कल्पना यांना आपण आता दिल्लीत राहायला आलो असून आपण आपली किडनी विकल्यानं आपल्याला 4 कोटी रुपये मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुलाही तुझी किडनी विकायची असल्यास 10 लाख रुपये डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील. त्यानंतर तुला परदेशात नेऊन तुझी किडनी काढली जाईल, अशी बतावणी केली.


तिच्या या आमिषाला बळी पडत कल्पना यांनी रुबिना हीचा पती अरविंद कुमार याच्या खात्यात मे 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत साडेआठ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर आपली किडनी कधी विकली जाईल? अशी विचारणा कल्पना यांनी केली असता रुबिना आणि तिच्या पतीनं टाळाटाळ सुरू केली. त्यामुळं कल्पना मगर यांनी ऑगस्ट 2021 मध्ये अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.


त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी नेपाळी गायिका रुबिना बादी आणि तिचा पती अरविंद कुमार या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर 6 महिन्यांनी पोलिसांनी गायिका रबिना बादी हिचा पती अरविंद कुमार याला बेड्या ठोकल्या आहेत. तर रबिना बादी ही मात्र अजूनही फरारच असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे. दरम्यान, रबिना आणि अरविंद कुमार यांनी मिळून आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यताही व्यक्त होत असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. अशाप्रकारे ऑनलाईन फसवणूक टाळायची असेल, तर वेळीच पोलिसांना माहिती देण्याचं आवाहनही भोगे यांनी केलं आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha