ठाणे : निवडणुकांचा प्रचार संपल्याने नेतेमंडळी व कार्यकर्तेही एकमेकांवर टीका करताना सध्या दिसून येत नाहीत. मात्र, दोन पक्षातील कार्यकर्त्यांचा वाद किंवा राग अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. कल्याणमध्ये शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात ही घटना घडली असून दुचाकी खालचा दगड उडून लागल्याचे निमित्त झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, सुयोगच्या पाठीवर वण उमटल्याचं दिसून येत आहे. 


कल्याणमधील मारहाणीच्या घटनेत शिवसेना गटाचा पदाधिकारी सुयोग देसाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मारहाण करणाऱ्या  तरुणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कल्याण पूर्वमध्ये सुरु असलेली गुंडागर्दी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


कल्याण पूर्व परिसरात राहणारे सुयोग देसाई हे शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने खडेगोळवली परिसरातून जात होते. यादरम्यान त्यांच्या दुचाकीच्या टायरखाली आलेला दगड उडून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला लागला. संतापलेल्याला तरुणाने आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सुयोग यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर, या दोघांमध्ये वाद झाला व या वादातून या तरुणांच्या टोळक्याने सुयोग देसाई यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुयोग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मारहाणीनंतरचा सुयोग यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या  तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. 


हेही वाचा


माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले