Nagpur News : गेल्या काही आठवड्यांत शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. शहरात मागील चोवीस तासात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. यापैकी शांतीनगर पोलीस स्टेशनच्या (Shanti Nagar Police Station) हद्दीत महेशनगर भागात एका व्यावसायिकाच्या घरात कोणीही नसताना चोरट्यानी तब्बल दीड किलो सोनं आणि तेरा लाखाची रोकड चोरून नेली आहे. नागपूरच्या महेशनगरच्या कश्यप कॉलनीत जावेद अब्दुल रज्जाक हे कुटुंबियांना सोबत कामठी येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने ही चोरी केली आहे. चोरट्यानी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर लाकडी अलमारी तोडून त्यात असलेले इलेक्ट्रॉनिक लॉकर तोडून दीड किलो सोन्याचे दागिने तसेच 13 लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपीचा शोध सुरु केला आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे शांतीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
कुटुंब गेले बाहेरगावी, चोरट्यांची दिवाळी
दिवाळीसाठी भंडारा (Bhandara) येथे भावाकडे गेलेल्या इसमाच्या घरी घुसून 2.20 लाखाचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुष्पकुमार रुपचंद श्रावणकर (51. सरोजनी हाऊसिंग सोसायटी, स्वागतनगर, न्यू नरसाळा) हे शुक्रवारी 28 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता आपल्या घराला कुलूप लावून दिवाळीसाठी भंडारा येथे राहत असलेल्या भावाकडे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्याचांदीचे दागिने किंमत 70 हजार आणि रोख 1.50 लाख असा एकूण 2.20 लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. शनिवारी 29 ऑक्टोबरला रात्री 8 दरम्यान घरी आल्यावर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. श्रावणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लाखोंचे दागिने पळवले
बाहेरगावी दिवाळीला कुटुंबासह गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरी केला. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हदीत जुना बगडगंज मोना बारच्या मागे 26 ऑक्टोबरला सकाळी 9.30 ते 29 ऑक्टोबरच्या दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. मदन अंतुजी आगरे (44) असे फिर्यादी व्यक्तीचे नाव आहे. दिवाळीला बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने लोखंडी आणि लाकडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने तसंच रोख 8500 रुपये, शेतीचे, घराचे व शैक्षणिक कागदपत्र असा एकूण 3 लाख 45 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली चौकावर एका भाजी व्यापाऱ्याच्या घरातूनही 56 लाख रुपयांची रोकड चोरट्याने चोरुन नेली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून 27 लाखांची रक्कम जप्त केली होती. या चोरीटी 'टीप' नोकरानेच साथीदारांनी देऊन चोरी घडवून आणल्याची माहिती पोलिस तपासातून उघड झाली होती. त्यामुळे नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असल्याचं चित्र आहे.
महत्त्वाची बातमी