Nagpur News : नागपूर-हैदराबाद हे अंतर सुमारे 550 किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यासाठी सध्याच्या घडीला सुमारे आठ तास लागतात. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रयत्नाने हे अंतर साडेतीन तासांमध्ये पार होणार आहे. नितीन गडकरी हैदराबाद मार्गाचे पुनरुज्जीवन करणार आहेत. हा संपूर्ण रस्ता आठ पदरी करण्याचा संकल्प गडकरींनी केला आहे. नागपूर-हैदराबादचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट गडकरींनी ठेवले आहे.
नवीन द्रुतगती महामार्ग
मुख्यत: देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्याचा संकल्प गडकरींनी केला आहे. येत्या वर्षभरात देशात 25 हजार कोटींचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने नागपूर-हैदराबाद मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. हा नवीन मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआरही तयार करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्याची योजना आहे.
समृद्धी महामार्गाला लागत होणार
मध्यवर्ती नागपूर येथून पुण्यासाठी गरीब रथाशिवाय अन्य सुविधा नाही. रस्ते मार्गाने जाण्यासाठी किमान 15 तास लागतात. हीच अडचण लक्षात घेऊन आता नव्याने एक मार्ग तयार केल्या जाणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाला लागून जालना ते नगर आणि पुण्याला जोडण्यात येणार आहे. यामुळे पुणे येथे जाण्यासाठी नागपूरकर आणि पुण्याच्या नागरिकांची सोय होणार आहे. पुढच्या वर्षी 25 हजार कोटींचे रस्ते तयार करण्याचा मानस असून यासाठी निधी प्राप्त करण्याच्या उद्देशाने बॉण्ड जारी करण्यात आले आहेत. मुंबई-दिल्ली, नागपूर-हैदराबाद, पुणे-बंगळुरुसह देशात 27 नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार करण्यात येत आहे. एक लाख कोटी रुपयांचा हा मार्ग असणार आहे.
समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी टप्पा
समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी (Samruddhi Mahamarg Nagpur to Shirdi) या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली नुकतीच नागपुरात दिली होती. गडचिरोली दौऱ्यासाठी आले असताना नागपर विमानतळावर (Nagpur Airport) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या