बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करुन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचे म्हटले.


तसेच, मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. आता, यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. 


सीआयडीचे आयपीएस अधिकारी पीडित कुटुंबियांच्या भेटीला 


दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाला आता गती प्राप्त झाली असून सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले आहे. सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. तर विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडीचे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे. सीआयडीचे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.


माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही- धनंजय देशमुख


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच, आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत हा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यावर, फडणवीसांनी माहिती देताना, याप्रकरणी एसआयटी नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. आता, धनंजय देशमुख यांनीही एसआयटीवर विश्वास ठेवावा लागेल, असे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT नेमली असून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील.


तर या प्रकरणात जातीवादाचा काहीच संबंध येत नाही, असं देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे, याप्रकरणाला जातीय रंग देण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा असल्याचे धनंजय देशमुख यांनी सूचवले आहे. मात्र, याप्रकरणात राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चालढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का, याचीही चर्चा जिल्ह्यात होत आहे.


हे ही वाचा