Sangli Crime : दुकान मालकाने पगार (Salary) दिला नाही म्हणून दुकानातील कामगाराने आठ लाखा रुपयांहून अधिक रक्कम असलेली तिजोरीच पळवून नेल्याची घटना सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा शहरात घडली आहे. विटा शहरातील जिओ मार्ट ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी सेंटरमध्ये आठवडाभरापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात विटा पोलिसांना यश आलं आहे. विटा पोलिसांनी कामगारासह त्याच्या एका साथीदाराला अटक करत त्याच्याकडून 7 लाख 20 हजार रोख रकमेसह दुकानातील तिजोरी आणि दुचाकी असा एकूण आठ लाख रुपयांच्या आसपासचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशाप्रकारे विट्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या चोरीचा तपास लावण्यात विटा पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना विटा पोलिसांनी जेरबंद केलं आहे. दोन्ही आरोपी 21 वर्षांचे असून ते बलवडी इथे राहतात.
विटा मधील जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये 9 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती. शटरचे कुलुप तोडून आरोपींनी सेंटरमध्ये प्रवेश करुन तब्बल 8 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याचा तपास विटा पोलिसांनी शिताफीने करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम आणि पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. चोरी करणारे दुकानातील कामगार असावेत अशी पोलिसांना आधी शंका आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी दुकानात कामगार असलेला मनिष देवदास झेंडे (वय 21 वर्षे) याला ताब्यात घेत त्याच्यांकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार पवन मधुकर होंडे (वय 21 वर्षे)याच्यासोबत मिळून दुकानातील तिजोरी पळवून नेला असल्याचे मान्य केले.
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता चोरीचे कारण समोर आलं आणि पोलीसही चक्रावले. दुकान मालकाने पगार दिला नाही म्हणून आपण तिजोरीच पळवली असं कारण चोरांनी पोलिसांना सांगितलं. आरोपींनी तिजोरीच उचलून नेली आणि त्यातून तब्बल 7 लाख 20 हजारांची रोख रक्कम लांबवली होती. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल, गोदरेज कंपनीची तिजोरी आणि गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असे 8 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
VIDEO : Sangli Crime : 9 लाखांची रोकड लांबवणारे गजाआड ABP Majha