Sangli Crime News: सांगलीच्या विटामध्ये तलवार विक्री करणाऱ्या एका तरुणाला विटा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 17 हजार रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. भगतसिंह शीख असं या तरुणाचं नाव आहे. तासगाव-आळसंद रोडवर विटा पोलिसांनी सापळा रचून तलवार विक्री करत असताना त्याला पकडलं आहे. सदर तरुण सांगली शहरात राहत असल्याचं समोर आलं असून त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी भगतसिंह शिखला न्यायालयासमोर हजर केलं असता 14 जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पण नेमकं इतक्या संख्येनं तलवारी कशासाठी खरेदी केल्या जात होत्या आणि कुठे नेल्या जात होत्या? याचा तपास केला जात आहे. 


तासगाव ते आळसंद बायपास रोडवर एक व्यक्ती तलवार विक्री करण्यासाठी फिरत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता काही वेळानंतर एक व्यक्ती मोटारसायकलवरुन येत असल्याचं आढळून आलं. तिच्यावर संशय आल्यानं संबंधित व्यक्तीचा पाठलाग करुन तिला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. 


दरम्यान, त्याच्याजवळील एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये 17 हजार रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी सापडल्या. या तलवारींबाबत अधिक चौकशी केली असता, त्यानं या तलवारी विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं. याबाबतची कबुली आरोपी भगतसिंहनं दिली. सध्या वेगवेगळ्या शहरांत घडणाऱ्या घडामोडी आणि एकूणच राज्यातील सामाजिक वातावरण पाहून जिल्हा पोलीस दलानं सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्ह्याच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र बंदी आदेशाप्रमाणे शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका इत्यादी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास किंवा बाळगण्यास मनाई आदेश केले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ही कारवाई केली आहे.