सोलापूर : पैशांची गरज भासवून सोनार, बँका, पतसंस्था यांच्याकडे बनावट सोने गहाण ठेवून लाखोंची फसवणूक करणारे एक रॅकेट सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सोलापुरातील मोहोळ तालुका पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 9 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर त्यापैकी 5 जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.


बनावट सोने गहाण ठेवून सोनारांची फसवणुक सुरु असल्याची तक्रार मोहोळ पोलिसात एका सोनाराने केली होती. याचाच तपास करत असताना पोलिसांना मोठे रॅकेट असल्याचे लक्षात आले आहे. दिल्लीतून पुण्यापर्यंत कुरिअर मार्फत त्यानंतर एजंटामार्फत मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या ठिकाणी हे बनावट सोने आणण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आले आहे. याप्रकरणी पप्पू उर्फ दावल तांबोळी, ईस्माईल मनियार, मनोज बनगर (रा. सांगली), बळीराम यादव (रा. माढा), बबलू उर्फ इसाक पठाण, बबलू उर्फ सद्दाम तांबोळी, नवनाथ सरगर (रा. कोल्हापूर), योगेश शर्मा (रा. सांगली) यांच्यासह अन्य काही अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील एका सोनार दुकानात आरोपी पप्पू उर्फ दावल तांबोळी यांनी पैशांची गरज आहे, म्हणत सोनसाखळी गहाण ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी तांबोळी पुन्हा पैशांची अडचण आहे म्हणत आणखी सोनसाखळी घेऊन त्याच दुकानात गेला. त्याही वेळी सोनाराने तांबोळी याची सोनसाखळी गहाण ठेवून घेत लाखो रुपये दिले. मात्र, पुन्हा एकदा आरोपी पप्पू तांबोळी याने सोनसाखळी गहाण ठेवण्यासाठी आणल्यानंतर सोनाराला शंका आली. त्यांनी या सोनसाखळींची सोलापुरात तपासणी केली असता सोनसाखळी बनावट असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनाराने मोहोळ पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पप्पू तांबोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.


9 कोटींच्या चर्चित दरोडा प्रकरणातील आरोपीची पाठलाग करत भरवस्तीत हत्या, सांगलीत खळबळ


पप्पू याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अन्य दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्था आणि सोनाराची फसवणूक याद्वारे केली असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना याचे काही धागेदोरेही सांगलीत असल्याचे देखील पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार मोहोळ पोलिसांची एक टीम सांगलीत पोहोचली असताना योगेश शर्मा याच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्या 900 ग्रॅमहून अधिक वजनाचे सोने आणि 6.5 किलोहून अधिक वजनाची चांदी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या या सोने-चांदीचा अधिक तपास सुरु असून हे देखील बनावट आहे किंवा कर चुकवून आणण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांमार्फत सध्या सुरु आहे.


या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी भांदवि कलम 420, 423, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी 5 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तर इतर सर्व आरोपी हे अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष इंगळे आणि पो. कॉ. प्रविण साठे हे करत आहेत. मात्र गुन्ह्याचा सगळा प्रकार पाहता राज्यभरातील आणखी काही शहरात देखील ही टोळी कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास देणे आवश्यक आहे.