सांगली : सांगलीमध्ये धारदार शस्त्राने भरवस्तीमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाठलाग करून शहरातील गणेशनगर भागात ही हत्या करण्यात आली आहे. मैनुद्दीन मुल्ला असे या व्यक्तीचे नाव असून कोल्हापूरच्या वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरणातला तो मुख्य संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. 2016 साली सांगली-मिरज रोडवरील बेथलेमनगर मधील घरातून मुल्लाकडून 9 कोटी रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या या दरोड्यामध्ये पुढे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना या चोरी प्रकरणी अटक झाली होती. तर मैनुद्दीन मुल्ला हा जामिनावर बाहेर होता.


सांगली शहरातल्या गणेशनगर येथील अलिशान चौक या ठिकाणी मैनुद्दीन मुल्लाची हत्या करण्यात आली आहे. पाठलाग करून मुल्ला याची भरवस्तीमध्ये रात्री 9 च्या सुमारास हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. घरामध्ये मुल्ला गेल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी गंभीर वार केला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.


घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृत मैनुद्दीन मुल्ला हा कोल्हापूर जिल्ह्याच्या वारणानगर या ठिकाणी 2016 मध्ये झालेल्या नऊ कोटी दरोड्यातील मुख्य आरोपी होता. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या या दरोड्यामध्ये सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना या चोरी प्रकरणी अटक झाली होती.