नागपूरः लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (Lakadganj Police Station) नेहरू पुतळ्याजवळ युवकावर चाकुने हल्ला करत, 20 लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या 8 आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने गुरुवारी अटक केली. अद्याप या प्रकरणातील सूत्रधार सहा लाख रुपयांसह फरार असून पथक त्याचा शोध घेत आहे. मात्र केवळ मौजमजेसाठीच या युवकांनी प्रत्यक्षात दरोडा घातल्याची माहिती समोर आली आहे. 


सर्व आरोपी तरुण, मुख्यसूत्रधार अद्याप फरार


आर्यन महेंद्र पडोळे (वय 19,रा. मस्कासाथ,पाचपावली), कुणाल चंद्रभान बोकडे (वय 19, रा. तांडापेठ), आदित्य दीपक कोटीवान (रा. न्यू सोमवारीपेठ), प्रणय अशोक लांजेवार (वय 22, रा. बेलेनगर, कळमना), अथर्व विलासराव अक्सर (वय 21, रा. रामनगर बारीपुरा), समीर अहमद वल्द नूर मोहम्मद उर्फ सोनू (वय 22, रा. मोठा ताजबाग), पियुष दीपक धारगावे (वय 20, रा.वकील पेठ), अथर्व विजय डाहे (वय 18, रा. राउत चौक, शांतीनगर) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी आदित्य आणि समीर यांच्यावर खुनाचा गुन्हा असून एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे.


चाकूने हल्ला करत 20 लाखांवर डल्ला


मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ दशरथजी चावडा (वय 21, रा. आर.के. सदन, नेहरू पुतळा, इतवारी) हा पिशवीत 20 लाख रुपये भुतडा चेंबर येथील लॉकरमध्ये ठेवण्यासाठी जात होता. यावेळी अनाज बाजार येथे पार्थ आला. त्याला पाच आरोपींनी घेरले. त्यापैकी दोघांनी त्याला पकडले. एकाने चाकून काढून त्याला जीवे मारण्याची धमकी देत, त्याचा हातावर आणि डोक्याला दुखापत करत, जखमी केले. यावेळी सर्वच जणांनी त्याच्या जवळील 20 लाख रुपये असलेली पिशवी हिसकावली आणि पळून गेले. घटनेबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 


सीसीटीव्हीमुळे पटली ओळख


यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV) तपासले असता, त्यात आरोपींची ओळख पटली. त्यानुसार पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा मित्रासोबत फिरत असलेल्या आर्यनला पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या (Mobile Location) माध्यमातून ताब्यात घेतले. त्याच्या वाहनामध्ये पैसे आढळून आले. त्यामुळे त्याच्या माध्यमातून इतर चौघांनाही पथकाने अटक केली. दरम्यान त्यांना टिप देणारा अथर्व अक्सर, आश्रय आणि पैशाचं वाटप करणारा समीर, पैसे ठेवणारा पियुष धारगावे आणि अथर्व डाहे याला अटक करण्यात आली त्यांच्याकडून 13 लाख 99 हजार रुपये जप्त करण्यात आले. याशिवाय गुन्‍ह्यात वापरलेले वाहन आणि चाकू जप्त करण्यात आला. दरम्यान गुन्ह्याखाली मुख्य आरोपी मन्या भुते (रा. तांडापेठ) हा अद्यापही फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur Crime : नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख चढताच, तरुणावर चाकूने वार करत 20 लाख रुपये लुटले


Nagpur Crime : प्रेयसी इन्स्टाग्रामवर दुसऱ्या युवकाशी बोलायची! तरुणाने उचलले टोकाचे पाऊल