मुंबई :  शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल क्लासरुम निर्माण व्हाव्यात यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, असे असताना सुद्धा मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी शिक्षण संस्था, वसतिगृहाची अवस्था तुम्ही पाहाल तर तिथे धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ना हॉस्टेलची योग्य सोय, ना व्यवस्थित वर्गखोल्या, ना खानावळ, ना कँटीन अशाच परिस्थिती इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव एबीपी माझाने समोर आणले आहे.


पनवेलमधील आयटीआय कॉलेजची अवस्था एखाद्या भूत बंगल्यासारखी झालीय.  विशेष म्हणजे 2014 साली ही इमारत धोकादायक ठरवूनही त्याच ठिकाणी वर्ग भरवले जातात. म्हणजेच जवळपास आठ वर्ष हजारो विद्यार्थ्यांनी जीवमुठीत घेऊन शिक्षण घेतलंय.  वर्ग खोल्यात तुटलेल्या खिडक्या, वाकलेले फॅन्स, तुटके बॅन्च अशात कित्येक विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. याच आयटीआय कॉलेज आणि हॉस्टेलपासून 100 मीटर अंतरावर जिथे भविष्यातले शिक्षक घडवले जातात. त्या बीएड कॉलेजच्या हॉस्टेलचीही स्थिती अशीच आहे. आणि अशाच परिस्थिती इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.  


याच आयटीआय कॉलेज आणि हॉस्टेलच्या 100-200 मीटर अंतरावर भविष्यातील शिक्षक घडविले जातात. त्याच बीएड कॉलेजच्या हॉस्टेलची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मागील सहा वर्षांपासून मुलांचे हॉस्टेल बंद आहे.  मुलींच्या हॉस्टेलमधील खोल्यांना दरवाजे नसल्याने तात्पुरत्या   स्वरूपात विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी   विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे गरीब आणि दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय येथे करण्यात आली आहे.  तर मुलींची सोय दुसरीकडे करण्यात आली आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.  


या संदर्भात आम्ही  कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता लवकरच विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले गेले. खरंतर सरकार हे वसतिगृहसाठी निधी मोठ्या प्रमाणावर जाहीर करतय. वसतिगृह निर्माण होतील,अशा घोषणा करतय. मात्र जिथे खरंच विद्यार्थ्यांना वसतिगृहाची गरज आहे. तिथे विद्यार्थी कशाप्रकारे राहतात हे वास्तव समोर आले आहे.  सरकार हे विद्यापीठ, शैक्षणिक संस्था हायटेक करण्यासाठी लाखो कोटी रुपयांचा अनुदान देत आहे. मात्र आपल्याच शासकीय वसतिगृहाकडे  कानाडोळा करतय. मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतचे नारे दिले जातात. मात्र प्रत्यक्षात जिथे स्किल डेव्हलपमेंटचे धडे दिले जातात त्याच शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना ही शिक्षा का ? राज्याच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य मोडकळीस आलेल्या पडक्या इमारतीत का? या विद्यार्थ्यांच्या जीवाशी सरकार का खेळतय? असा प्रश्न विद्यार्थी सरकारला विचारताय आणि हेच प्रश्न आम्ही आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.