Nagpur Crime : नागपुरातील (Nagpur) 21 वर्षीय युवकावर चाकूने वार करत त्याच्याकडील 20 लाख रुपयांची रक्कम लुटल्याचा प्रकार घडला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या (Lakadganj Police Station) हद्दीत असलेल्या नेहरु पुतळ्याजवळ मंगळवारी (27 सप्टेंबर) रात्री ही थरार घटना घडली. पार्थ दशरथजी चावडा (वय. 21, रा. आर.के. सदन, नेहरु पुतळा, इतवारी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो धान्य बाजार (Grain Market Itwari) परिसरातील कमलभैय्या नावाच्या कमिशन एजंटकडे कामाला आहे.
आरोपींना टीप कोणी दिली?
पार्थ चावडा हा रात्री साडेआठच्या सुमारास पिशवीत 20 लाख रुपये भुतडा चेंबर येथील लॉकरमध्ये (Money Locker) ठेवण्यासाठी जात होता. यावेळी धान्य बाजार येथे पार्थ आला. त्याला पाच ते सहा आरोपींनी घेरले. त्यापैकी दोघांनी त्याला पकडले. एकाने चाकू काढून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान आरोपींनी त्याच्या हातावर आणि डोक्याला दुखापत करत जखमी केले. लुटारुंनी त्याच्याजवळील वीस लाख रुपये असलेली पिशवी हिसकावली आणि पळून गेले. यावेळी त्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक आले. त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलभैय्या नामक व्यक्ती हा इतवारी परिसरात कमिशनचे काम करतो. त्याला मिळालेले कमिशनचे (commission) पैसे त्याच्याकडे काम करणाऱ्या पार्थच्या माध्यमातून लॉकरमध्ये जमा करत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला. घटनेला चोवीस तास उलटून गेले असतानाही पोलिसांना आरोपी गवसले नसल्याची माहिती आहे. त्यातून प्रकरणाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पार्थ चावडा लॉकरमध्ये एवढी मोठी रक्कम ठेवण्यासाठी जात असल्याची टीप आरोपींना कोणी दिली हा देखील प्रश्न विचारला जात आहे.
लॉकरमध्ये हवालाची रक्कम?
चाकूचा धाक दाखवत 20 लाख लुटल्याच्या घटनेनंतर इतकी मोठी रक्कम तेही रात्रीच्या सुमारास कशी काय लॉकरमध्ये भरण्यासाठी नेण्यात येत आहे, याबाबत चर्चेला पेव फुटले होते. त्यामुळे हा पैसा हवालातील असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. अद्याप पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नसला तरी, आरोपी न गवसल्याने पोलीसही प्रकरणाबाबत निश्चित सांगण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांना जेल की बेल? युक्तिवाद संपला, हायकोर्टानं निकाल राखून ठेवला