Ratnagiri Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावात सुपारी समजून अडकित्त्यानं गावठी बॉम्ब कापल्यानं स्फोट होऊन एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. लक्ष्मी सखाराम देवळी यांनी मुलाच्या मित्राच्या आईसाठी चार सुपाऱ्या दिल्या होत्या. घरी आल्यावर सुधीर यांनी सुपाऱ्या आईच्या हातात दिल्या. हुबेहूब सुपारीसारखी दिसणारी वस्तू लक्ष्मी यांनी अडकित्त्यानं फोडली आणि त्याचा जोरदार स्फोट झाला. अचनाक घडलेल्या घटनेनं संपूर्ण गावात खळबळ उडाली. तसेच, या घटनेमुळं संपूर्ण गावात सुपारी सदृश बॉम्बची भीती पसरली आहे. 


सुपारी सारख्या असणाऱ्या या गावठी बॉम्बच्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्यांच्या डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा तुटून पडले. तर मधल्या बोटाला जबर दुखापत झाली. रक्ताचे तुषार घरभर पसरले. काही क्षणातच घडलेल्या घटनेनं संपूर्ण कुटुंब पुरतं हादरलं. 


स्फोटाचा आवाज एवढा भयानक होता, शेजारील व्यक्तीही त्या आवाजानं दचकले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी जखमी महिलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संबंधित घटनेची माहिती वृद्धेचा पती सखाराम देवळी यांनी पोलीस ठाण्यात दिली.


सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि उर्वरित मुद्देमाल ताब्यात घेतला. हुबेहूब सुपारीसारखा दिसणारा हा गावठी बॉम्ब कुठून आला? याबाबत आता पोलिस कसून तपास करत आहेत. संबंधित संशयितांचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :