Mumbai Crime News : मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळत असताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अॅन्टॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे. इथं पाईपलाईनचं टाकण्याचं काम सुरु होतं, मात्र त्यावेळी तिथं बॅरिकेटिंग न केल्यानं दुर्घटना घडल्याचं बोललं जातं आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावं आहेत. हे दोघं उद्यानात खेळत होते, त्यावेळी पाईपालाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतल्या ॲन्टॉप हिल परिसरातल्या सेक्टर 7 मधल्या उद्यानात पाइपलाइन दुरुस्तीचं काम सुरु होते. त्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात खड्ड्यात पाणी साचल्यानं दोन मुलांचा यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यासंबंधी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, याप्रकरणी नातेवाईकांकडून आता सीपीडब्लूडीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
ॲन्टॅाप हिल सी. जी. एस कॉलनी, सेक्टर 07 येथील उद्यानात पाईपलाइन दुरुस्तीकरता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचून तिथं पाण्याचं डबकं बनलं होतं. सदर मैदानात खेळणारी दोन मुलं पाण्याच्या डबक्यात पडली असल्याचं आढळून आल्यानं सदर मुलांना तात्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे उपचाराकरता नेण्यात आलं. परंतु, रुग्णालयात जाण्यापूर्वीच या चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता.
मुलांना उपचारासाठी रुग्णालत दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मयत घोषित केलं. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. तसेच, घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर या मुलांची ओळख पटली. दरम्यान, सदर प्रकरणी अॅन्टॉप हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे चिमुकल्यांचा शवविच्छेदन अहवान प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना योग्य त्या सुरक्षिततेच्या उपायोजना केल्या नसल्यानं ही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासंबंधी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :