Goldy Brar Detained: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi Singer Sidhu Moose Wala) यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) याचा सुगावा एफबीआयला (FBI) लागल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्डीला कॅलिफोर्नियामध्ये ट्रॅक करण्यात आलं आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी समोर येत आहे. अमेरिकेत एफबीआयनं गँगस्टर गोल्डी ब्रारचा शोध सुरु केला आहे. एफबीआय लवकरच गोल्डी ब्रारला अटक करणार असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारनं हत्येची जबाबदारी घेतली होती.


गोल्डी ब्रार गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडात (Canada) बसून अनेक गंभीर गुन्ह्यांची सूत्र हलवत होता. कॅनडातूनच तो भारतात खून आणि तस्करीचे काम करत होता. त्यासाठी त्याला लाखो रुपये मिळत असल्याचीही माहिती समोर आली होती. परदेशात बसूनच सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकाडांच कट गोल्डी ब्रारनं रचल्याचं बोललं जात आहे. त्यानंच आपल्या गुंडांकडून सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो अमेरिकेत पळून गेला. मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्या वतीनं एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यानं मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचं कबुल करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.


गोल्डी ब्रारनं स्विकारलेली  सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी


काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी ल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली होती. गोल्डी ब्रार सध्या कॅनडात लपून बसला असून तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीनं एका कथित फेसबुक पोस्टद्वारे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.


कॅनडात कसा पोहोचला गोल्डी ब्रार? 


श्री मुक्तसर साहिबचा रहिवासी असलेला ब्रार 2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडाला गेला होता. ब्रार याच्यावर नोव्हेंबर 2020 आणि फेब्रुवारी 2021 मध्ये खून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी विकी मिड्डूखेडा याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या 


पंजाबमधील आप सरकारनं सिद्धू मुसेवाला यांना दिलेली 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले होते. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली होती. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.