Maval Murder : पुण्याच्या (Pune) मावळ (Maval) तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता आरोपी तेजस दळवीच्या (वय 24 वर्षे) आईला देखील कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. सुजाता दळवी असं आईचं नाव असून पुरावे नष्ट करण्यासाठी तिने मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
सात वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी, 2 ऑगस्टच्या दुपारपासून बेपत्ता होती. यानंतर मुलीच्या वडिलांनी तिचं घराजवळून अपहरण झाल्याची तक्रार कामशेत पोलिसात नोंदवली. वडिलांच्या तक्रारीवरुन पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता. अखेर बुधवारी (3 ऑगस्ट) गावातील जिल्हा परिषद शाळेमागे विचित्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांना जी भीती होती, तेच शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. तेजसने हत्येपूर्वी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते.
24 तासात आरोपीला बेड्या
घटनेचं गांभीर्य ओळखून कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि 24 तासांच्या आता तेजस उर्फ दादा दळवीला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या माहितीनुसार, "मावळमधील एका बंगल्यातील कामगाराच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित मुलगी मंगळवारी अखेरची त्याच्यासोबतच दिसली होती. त्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली." दरम्यान आरोपी तेजस दळवी हा मुलीच्या घराशेजारीच राहत होता आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असंही अशोक शेळके यांनी सांगितलं.
पुरावे नष्ट करण्यात आई सामील
या घृणास्पद प्रकरणातून मुलाची सुटका करण्यासाठी आई सुजाता दळवीनेही मदत केली. पुरावे नष्ट करण्यात ती सामील होती, हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे.
ग्रामस्थ आक्रमक, आरोपीला फाशीची मागणी
या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत ते आंदोलन करत आहेत. तर अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनंही केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.