Latur Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (rain) कहर केला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात देखील तुफान पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि औसा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळं तेथील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे. तसेच नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
उदगीरमध्ये जोरदार पाऊस
लातूर जिल्ह्यातील उदगीर हे मोठे शहर आहे. उदगीर शहरात रात्री तुफान पाऊस झाला आहे. पावसानं उदगीर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झालं होतं. उदगीर शहरातील बाजारपेठेमध्ये असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच शहरातील सखल भागांची अवस्था तर अतिशय वाईट झाली होती. दुकानात पाणी शिरल्याने अनेक मूल्यवान वस्तू आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू आणि संसार उपयोगी इतर साहित्याचे नुकसान झालं आहे. दुकानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोटर लावल्याचे पाहायला मिळालं. बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानात इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्याचे खूप मोठे नुकसान झालं आहे.
शिवनी कोतल भागात ढगफुटी
लातूर जिल्ह्यातल्या शिवनी कोतल भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या तुफान पावसाने गावातल्या शिवारात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. शेतीचं नव्हे तर गावातली सगळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लातूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केलेला पाहावयास मिळत आहे.
निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. शेताचे रुपांतर शेत तळ्यात झालं आहे. अनेक ठिकाणी जमीनी खरडून गेल्या आहेत. पिकं वाहून गेली आहेत. औसा तालुक्यातील भेटा आणि अदोरा येथील पुलावर पाणी आलं आहे. त्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. निलंगा तालुक्यातील वडगाव भागातही ढगफुटी झाली आहे. या गावाच्या शिवारातील प्रत्येक शेतात पाणीच पाणी झाले आहे. संपूर्ण शिवार पाण्याखाली गेला आहे. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाले आहे. अंतर्गत रस्त्यावरील छोटे मोठे पूल देखील पाण्या खाली गेले आहेत. दळणवळण करणं शक्य नसल्यामुळं अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
शेती पिकांना मोठा फटका
मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळं सोयाबीनचे पिकं पिवळी पडली आहेत. त्यातच रात्री झालेल्या तुफान पावसामुळे ही सर्व पिके पाण्याने वाहून गेली आहेत. या पावसामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतातील काळी माती वाहून गेल्याने खडके उघडी पडली आहेत. आता दुबार पेरणी तरी करायची कशी? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: