Pune Crime News :  व्हॉट्सअप (Whatsapp group) ग्रुपमधून रिमूव्ह (pune Crime) केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रीती किरण हरपळे असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला होता. तक्रारदार दाम्पत्य आणि  आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्यही होते. तक्रारदार महिलेचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. त्यांनी एका व्यक्तीला गृपमधून काढून टाकलं होतं. सोसायटीच्या व्हॉट्सअप गृपमधून काढून टाकल्याने त्या व्यक्तीचा राग अनावर झाला. मला व्हॉट्सअपच्या गृपमधून का काढलं? असं आरोपीने विचारलं होतं. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या पतीना भेटण्यासाठी बोलावून घेतलं  आणि मारहाण केली. 


मारहाणीत जिभेला पडले टाके...


तक्रारदाराचा पती या व्यक्तीला भेटायला त्याच्या घरी गेली. ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असं त्यानं सांगितलं. त्यानंतर आरोपीने पाच जणांच्या साह्ययाने बेदम मारहाण केली. तोंडावर लाथाबुक्कीने मारहाण केली. यात त्याच्या दाताला आणि जीभेला मार लागला. यामध्ये त्याची जीभ कापली गेली.  पोलीस या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.


सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ

पुण्यात सध्या सायबर क्राईम आणि सोशल मीडियावरील किरकोळ पोस्टमुळे होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. एका बारा वर्षाच्या मुलाने 11 वर्षाच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन लग्नाची मागणी घातली होती.  अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर मुलीचा फोटो शेअर केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.  सोशल मीडिया नीट हाताळा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.