Pune Latest News : पैसे नाहीत? ऑनलाईन कर्ज घेताय? मोबाईल ॲपवर कर्ज देणारे सतत मागे लागले आहेत? पैसे हवेत, मात्र कुठली तरी वस्तू तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही ना? जर ऑनलाईन कर्ज घेत असाल तर सावधान! ऑनलाइन कर्ज घेत आहे मग ही बातमी एकदा बघाच..
तुम्ही जर मोबाईल वरून ऑनलाईन कर्ज घेत असाल तर तुमच्या फोनची गॅलरी आणि कॉन्टॅक्ट लिस्ट ही आता तारण ठेवायला लागते आहे. हा आहे ऑनलाइन कर्जाचा नवीन ब्लॅकमेलिंग फंडा! दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पैसे वेळेत नाही दिले तर हेच तारण ठेवलेल्या गोष्टीचा गैरवापर करणं हा सायबर चोरट्यांचा हाताचा मळ झाला आहे. कारण तुम्ही कारण ठेवलेली फोटो गॅलरी हेच सायबर चोरटे गैरवापर करतात. तुमचेच फोटो मॉर्फ करून तुमच्याच कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या सर्व लोकांना ते पाठवले जातात आणि मग सुरू होतं ब्लॅकमेलिंग. काय आहे हा सायबर चोरट्यांचा नवीन पॅटर्न, पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून..
मोबाईल वर तातडीने कर्ज उपलब्ध असल्याचे अनेक मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये येतच असतील. कोरोना काळानंतर तर नोकऱ्या गेल्यानंतर तातडीने पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी अगदी दोन ते पाच हजार रूपयांची कर्ज मोबाईल वर ॲप च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठीच्या ॲपवर तुमच्या गॅलरीचा, कॅानटॅक्टचा ॲक्सेस मागितला जातो तो तुम्ही दिलात, कर्ज घेतलं आणि पैसे परतफेड करताना उशीर झाला किंवा अगदी पैसे परत फेडले तरी जास्त पैसे उकळण्यासाठी तुमच्या गॅलरीतले आप्तेष्टांचे फोटो मॅार्फ करून ते कॅानटॅक्ट लिस्ट मध्यल्या संबंधित किंवा परिचितांना घाणेरडा मजकुर लिहून पाठवले जातात. शेवटी हे थांबवण्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी केली जाते. यापध्दतीने शेकडोंची फसवणूक रोज होतेय.
लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी सामान्य नागरिक मिळेल त्या मार्गाने पैसे मिळवायच्या प्रयत्नात असतात आणि याचाच गैरफायदा हे ऑनलाईन लोन देणारे सध्या घेताना दिसत आहेत. तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यायचे आणि त्याच व्यक्तीला काही दिवसांच्या आत ब्लॅकमेलिंग करायचे असे उद्योग सध्या पुण्यासारख्या शहरात सर्रास सुरू आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक पोलिसांकडे धाव घेत आहेत मात्र त्यांच्या हाठी लागते ती म्हणजे घोर निराशा.
पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या सात महिन्यांपासून 15000 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तपास अजूनही अधांतरीच दिसत आहे. केवळ तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग अनेक नवीन प्रकार या सायबर चोरट्यांनी आजमावले आहेत आणि याला नाहक बळी पडतोय तो म्हणजे सामान्य नागरिक. तुमच्या मोबाईल फोन ची गॅलरी तारण ठेऊन कर्ज देणे हा तोच प्रकार आहे. पोलिसांपेक्षा ॲानलाईन फसवणूक करणारे जास्त वेगवान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. या फसवणुकीत आपण फसणार नाही ना ही काळजी आता तुम्हालाच घ्यावी लागणार आहे त्यामुळे सावधान रहा आणि सतर्क रहा..