Pune Crime : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) गायब झालेल्या वकिलाची हत्या झाल्याची शक्यता पोलीस तपासात वर्तवली जात आहे. कारण वकील शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील पोलिसांनी याप्रकरणी काहींना ताब्यातही घेतलं आहे. वकील शिंदे यांचे ते नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांनीच पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह पेटवला मात्र तो अर्धवटच जळल्याचं समोर येत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत, त्यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर यामागचं मूळ कारण समोर येणार आहे.


वकील शिवशंकर शिंदे कार्यालयातून बेपत्ता


वकील शिवशंकर शिंदे 31 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला, परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे शिंदे बेपत्ता झाल्याची शंका त्यांच्या मनात आली. यानंतर कुटुंबीय वाकड पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. परंतु वाकड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. अखेर रात्री उशिरा वकील शिवशंकर शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. पोलिसांनी तपास देखील सुरु केला. मात्र तपास सुरु झाल्यानंतर काही तास उलटले नाहीत तोपर्यंत शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला आहे. 


मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला


मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांची हत्या झाली असावी असा संशय वाकड पोलिसांनी व्यक्त केला. त्यात नांदेडमधील पोलिसांनी शिंदे यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनीच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अर्धवटच जळाला. आता या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच वकील शिवशंकर शिंदे यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.


पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ


सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात. त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. पोलिसांनाही तक्रारी देऊन कोणताही बंदोबस्त केला जात नसल्याचं चित्र आहे. पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य कधी ओळखणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.


VIDEO : Pune Crime : बेपत्ता झालेले वकील शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह नांदेडमध्ये आढळला