Pune Crime News:  अॅपवरून घेण्यात आलेल्या कर्जामुळे तरुणांकडून टोकाचे पाऊल उचलले जात आहे. पुण्यातही अशीच घटना (Pune Crime) समोर आली आहे. अॅपवरुन घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीची हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. सुलोचना सुभाष डांगे असं 70 वर्षीय हत्या झालेल्या आजीचं नाव आहे. या घटनेमुळे वारजेतील आकाशनगर परिसर हादरलं आहे. 


लोन अ‍ॅपवरुन (Loan App) गौरी डांगे या नातीने कर्ज घेतले होते.  कर्ज फेडण्यासाठी तिला तगादा लावण्यात आला होता. सायबर चोरांकडून कर्जाच्या रक्कमेसाठी धमकी देण्यात येत होती. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी आरोपी गौरीने आजीची हत्या करत घरातून आजीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि 36 हजार रोख रक्कम चोरले. आरोपी गौरीने 20 हजार रुपयांना मंगळसूत्र विकले आणि त्यातील 13 हजार रुपये धमकी देणाऱ्यांच्या खात्यावर जमा केले. या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना चौकशी दरम्यान गौरीवर संशय आला. पोलिसांनी गौरीची चौकशी केल्यानंतर तिने हत्या केल्याची कबुली दिली. 


मृत सुलोचना डांगे या मंगळवारी घरी एकट्या होत्या. वारजे परिसरात सुलोचना डांगे या त्यांचा मुलगा आणि नातीसह वास्तव्य करत होते. त्यांचा मुलगा सुतारकाम करतो. तर, गौरीदेखील नोकरी करते. दोघेही कामाला गेल्याने आजी सुलोचना या घरी एकट्याच होत्या. त्याचा फायदा घेत गौरीने आजीची हत्या करत घरातील दागिने आणि पैसे चोरून पसार झाली. भाडेकरु काही कामासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी आजी कोसळलेल्या अवस्थेत दिसल्या. घरात कपाट उघडं आणि वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. या सगळ्या घटनेच्या चौकशीत वेगवेगळी माहिती पुढे येत होती. पोलिसांना गौरीवर संशय आला.  पोलिसांनी गौरीची सखोल चौकशी केली. त्यावेळी गौरीने हत्या केल्याची कबुली दिली. 


ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर


दोन दिवसांपुर्वीही अशाच एका घटनेनं पुणे हादरलं होतं. आजीनं घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळे नातवानं आजीची हत्या केली होती. घर सोडून जाण्यास सांगितले आणि दागिन्यांचा ताबा न दिल्याच्या रागातून 20 वर्षांच्या नातवानं वडिलांच्या मदतीनं आजीचा खून केला होता. नातवानं आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झालं होतं. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी करत हा गुन्हा उघडकीस आणला. मुंढवा पोलिसांनी नातवाला आणि त्याच्या वडिलांना अटक केली होती. ही घटना ताजी असताना त्याच प्रकारची दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.