Pune Crime News : पुण्यातील (Pune) मुळशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर चक्क पाळीव श्वान सोडण्यात आले. रविवारी (24 डिसेंबर) रोजी मुळशीतील रिहे गावात ही घटना घडली आहे. शेवटी पोलिसांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर संबंधित सराइत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. मंगेश नामदेव पालवे (वय 32, रा. रिहे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी मंगेश पालवे विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर तो बऱ्याच दिवस येरवडा कारागृहात होता. दरम्यान, त्याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. मात्र, बाहेर येताच त्याने शनिवारी (23 डिसेंबर) रिहे गावात एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील 11 हजारांची रोकड लुबाडली. त्याबाबतची माहिती पौड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक मंगेश पालवेला ताब्यात घेण्यासाठी रिहे गावात पोहचले. पोलिसांना पाहताच पालवेने त्याचे पाळीव कुत्रे पोलिसांच्या अंगावर सोडले. श्वान पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेता आले नाही.
श्वानाला पकडण्यासाठी पोलिसांनी वनविभागाला माहिती दिली
पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्यावर पालवे घरात गेला. त्याने खिडकीतील काचेने स्वतःवर वार केले. बिअरची बाटली डोक्यात फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी पालवेच्या श्वानाला पकडण्यासाठी पोलिसांनी वनविभागाला माहिती दिली. तसेच, यावेळी पोलिसांनी पालवेला शरण येण्याचे आवाहन केले. शरण न आल्यास गोळीबार करू, असे पोलिसांनी त्याला सांगितले. त्यानंतर पालवे पोलिसांना शरण आला. तपासासाठी त्याला येत्या 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले. त्याच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
थेट पोलिसांच्या अंगावर सोडले कुत्रे...
मंगेश पालवे याने रिहे गावात एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील 11 हजारांची रोकड लुबाडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस चौकशी करण्यासाठी मंगेश पालवेच्या घरी पोहचले. दरम्यान, आता पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने त्याने आपले पाळीव श्वान पोलिसांच्या अंगावर सोडले. यामुळे पोलीस देखील हतबल झाले आणि त्याला ताब्यात घेऊ शकले नाही. दरम्यान, याचवेळी मंगेश आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत शरण येण्याचे आवाहन केले. सोबतच गोळीबार करण्याचा इशारा दिला. शेवटी तो पोलिसांना शरण आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या: