पुणे: बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली असून एका नराधमाने पाच वर्षे स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यात बापासह सावत्र आईचाही समावेश असून तिनेही मुलीचा छळ केल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सागर पवार (38) आणि उज्वला पवार (35) असं आरोपींची नावं आहेत.


पीडित तरुणी ही तिचे वडील आणि सावत्र आईसह येरवडा भागात वास्तव्यास आहे. वयाच्या अवघ्या पाच वर्षाची असताना पिडीत तरुणीच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर  भाजी विक्रेते असलेल्या तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. 2018 पासून आई-वडिलांनी मिळून अनेक वेळा या तरुणीवर अत्याचार केला. दोघांनी मिळून तिचा अनेक वेळा मानसिक छळदेखील केला असल्याचा आरोप आहे.


पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांनी तिच्यावर बलात्कार करायचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण तरीसुद्धा तिच्या आईने अनेक वेळा पतीचीच बाजू घेतली. 12 वी बोर्डाचा परीक्षेला जाताना एके दिवशी तिच्या वडिलांनी तिचे हॉल तिकीट फाडले. हताश झालेल्या या तरुणीने हा सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला आणि त्यानंतर त्या दोघींनी पोलीस ठाणे गाठले.


पोलिसांनी तिच्या आई आणि वडील दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून वडील सागर पवारला अटक केली आहे. या आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम अन्वये कलम 354, 324 आणि 504 यासह पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 


लग्नात हुंडा दिला नाही म्हणून छळ, विवाहितेची आत्महत्या 


लग्नात हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे हताश झालेल्या 21 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रुकय्या शहनवाज शेख असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यातील दत्तवाडी मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


नऊ महिन्यांपूर्वी रुकय्या आणि तिचे पती यांचा विवाह झाला होता. विवाहच्या काहीच दिवसात रुकय्याचा पती आणि सासू यांनी तिला हुंडा दिला नाही म्हणून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. लग्नामध्ये तिच्या माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही, या गोष्टीवरून तिला अनेक वेळा हिणवले जात होते. तसेच तिचा वारंवार मानसिक छळ केला जात  होता. लग्नात दिलेल्या भेट वस्तू या भेट वस्तू नसून त्या भिक घातल्या आहेत, असे म्हणून रुकय्या यांना पती आणि सासू यांनी मिळून अनेक वेळा घालून पाडून बोलले जात होते.  तसेच तिचा वारंवार मानसिक छळ केला जायचा. या सर्व जाचाला कंटाळून रुकय्याने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


ही बातमी वाचा: