नागपूर: इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर हा आता दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी प्रशांत कोरटकर याचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार आहे. मात्र, पोलिसांना अद्याप त्याला पकडता आलेले नाही. त्यामुळे पोलिसांची याप्रकरणातील भूमिका आणि तपास संशयास्पद असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता नागपूर आणि कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर यांना मदत केली असावी, असा संशयही व्यक्त केला जात आहे. 


प्रशांत कोरटकर याची नागपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबत उठबस होती. त्याच्या नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळखी होत्या. याच बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर याला सहीसलामत देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली असावी, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. प्रशांत कोरटकर याला मध्य प्रदेश आणि इंदौरमध्ये पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकर हा लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, कोल्हापूर पोलिसांचे पथक त्याला पकडायला गेले तेव्हा दोन्ही ठिकाणहून प्रशांत कोरटकर अगोदरच निसटला होता. त्यामुळे नागपूर पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोरटकर याला मदत करत असावेत, ही शक्यता बळावली आहे. यापूर्वी इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही प्रशांत कोरटकर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच कोरटकरने मोबाईलमधील डेटा डिलिट केला होता, असा आरोप सरोदे यांनी केला होता.


याशिवाय, प्रशांत कोरटकर याचा पोलीस गेल्या 15 दिवसांपासून शोध घेत आहेत. तो तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. मात्र, असे असूनही प्रशांत कोरटकर हा कोलकातासारख्या प्रमुख विमानतळावरुन व्हिसा वापरुन सहजपणे दुबईला जातो, ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकर याला देशाबाहेर सहीसलामत पळून जाण्यास पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी मदत केली असावी, असे बोलले जात आहे.


प्रशांत कोरटकर सर्वोच्च न्यायालयात जाणार?


प्रशांत कोरटकर याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक झाली असती. त्यामुळेच कोरटकर दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे. मात्र, आता तो थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर हा अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करेल. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला तरच तो भारतात परतेल, अन्यथा आणखी काही काळ दुबईतच मुक्काम करेल. मात्र, तोपर्यंत नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलीस काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 



आणखी वाचा


पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल