नागपूर : शहरातील महिला डॉक्टरला यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली एका आयकर आयुक्ताने शारीरिक शोषण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोघांमधील संबंधातून काही महिन्यांपूर्वी महिला डॉक्टर गर्भवती राहिली. त्यानंतर आरोप लागलेल्या आयकर आयुक्तांनी तिच्यावर दबाव टाकून बळजबरीने गर्भपात करायला लावल्याचा आरोपही पीडित डॉक्टरने केला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी सुथादिरा बालन या आयकर आयुक्तांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. 


आरोप लागलेले सुथादिरा बालन 35 वर्षांचे असून ते मूळचे पुदुचेरीचे राहणारे आहेत. काही महिन्यांपूर्वी ते आयकर विभागाच्या प्रशिक्षणासाठी नागपुरात आले होते. तेव्हा तब्येत बिघडल्याने ते एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तिथेच सुथादिरा बालन यांची ओळख 28 वर्षीय पीडित डॉक्टरसोबत झाली. पीडित महिला डॉक्टरला यूपीएससीची परीक्षा द्यायची असल्याने तिने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून आयकर आयुक्तपदी नेमणूक मिळवणाऱ्या सुथादिराकडे मार्गदर्शन मागितले होते. 


यूपीएससीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली आयकर आयुक्तांनी तिच्यासोबत सलगी वाढवली. नागपूर जवळच्या खापरखेडा भागात एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची पीडित महिला डॉक्टरची तक्रार आहे. एवढेच नाही तर आयकर आयुक्तांनी पदाचा रुबाब दाखवत तिला गर्भपात करायला मजबूर कल्याचे आरोपही तिने लावले आहेत. या प्रकरणी सुरुवातीला पीडित महिला डॉक्टर काही दिवसापुर्वी ही तक्रार द्यायला आली होती. मात्र, तेव्हा काही वेळाने तिने पोलिसांना तक्रार करायची नाही असे सांगत घर गाठले होते. आता पुन्हा पीडित महिलेने तक्रार करण्याचे ठरवत खापरखेडा पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर तक्रर नोंदविली. पोलिसांनी आवश्यक चौकशी केल्यानंतर महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून आयकर आयुक्त सुथादिरा बालन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.