Parbhani Crime News : किरकोळ वादातून परभणीत (Parbhani) मनसे (MNS) शहराध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. सचिन पाटील असं हत्या झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. विजय जाधव नावाच्या मित्राशी किरकोळ वाद झाल्यानंतर त्याने सचिन पाटील यांच्या मानेवर चाकून वार केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. 


किरकोळ वादातून झालेल्या भांडणात मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. 


परभणी शहरातील शिवराम नगर भागांत मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील राहत होते. त्यांच्या घरासमोरील एका घरात काही मित्र रात्री एकत्र जमले होते. यावेळी सचिन पाटील आणि विजय जाधव यांच्यात वाद झाला. हाच वाद एवढा विकोपाला गेला आणि यातूनच विजय जाधव यानं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केला. ही घटना घडताच त्यांना तत्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. सकाळी 10 वाजता शवविच्छेदन केलं जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 


काल गंगाखेड येथे मनसेच्या शाखेचं उद्घाटन 


कालच मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकार्यांसमवेत गंगाखेड तालुक्यातील मुळी येथे मनसेची शाखा स्थापन केली होती. कालच या शाखेचं उद्घाटन दणक्यात करण्यात आलं होतं. काल उद्घाटन झाल्यानंतर आज ही घटना घडल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :