Panvel Crime : खोपोली (Khopoli) इथून कामावरुन पनवेल (Panvel) इथे आलेल्या तरुणीवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दोघांनी सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची घटना घडली. रिक्षातून लिफ्ट देतो, असं सांगत आरोपींनी तिला एका पडीक इमारतीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी (Panvel Police) दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे रोजंदारी करणारे मजूर आहेत.
नेमकं काय घडलं?
पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "ही तरुणी पनवेल येथील राहणारी असून ती खोपोली इथल्या एका लेडीज बारमध्ये काम करते. शनिवारी रात्री उशिरा ही तरुणी तिची शिफ्ट संपवून कामावरुन घरी परतत होती. यानंतर ती पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉलजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. जेवण आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी मॉलजवळच ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबली. सामन्यतः या ठिकाणी गर्दी असते. यावेळी, आरोपी तरुणीजवळ आले. उशीर झाला आहे आणि रस्त्यावर एकटीनं थांबणं सुरक्षित नाही. त्यांनी तिला घरी सोडतो असं सांगितलं. तसेच, आम्ही काही अंतरावर ऑटोरिक्षा पार्क केली असल्याचं त्यांनी तरुणीला सांगितलं."
घरी जाण्यासाठी दुसरी रिक्षा न मिळाल्याने ही तरुणी त्यांच्यासोबत गेली. ते मुख्य रस्त्यापासून थोडं अंतर चालत गेल्यावर मॉलच्या मागे एका निर्जन भागात असताना त्यांनी तिला धमकावलं. त्यांनी तिला बळजबरीने रस्त्यापासून दूर नेलं. रेल्वे रुळ ओलांडून स्टेशनपासून थोडं दूर असलेल्या एका पडक्या इमारतीत नेलं. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या डोक्यावर वार करुन जखमी केलं. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला तिथेच सोडून पळ काढला, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादम यांनी सांगितलं.
24 तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
यानंतर तरुणीने पनवेल पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन दोघांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पनवेल स्थानकाजवळील झोपडपट्टीतून अटक केली. बलात्कार पीडित तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अविनाश चव्हाण (वय 22 वर्षे) आणि सूरज देवडे (वय 21 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींवर सामूहिक बलात्कार, अपहरण आणि दुखापत करण्याच्या हेतूने मारहाण या आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :