Maharashtra Palghar Crime News : पालघर : पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला आहे. एका 15 वर्षीय मुलीवर एकदा नाहीतर अनेकदा सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात (Palghar District) ही घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आधी आरोपीनं पीडित मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं वय 18 वर्ष आहे. तर दोन्ही आरोपींचं वय सुमारे 20 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. 


नेमकं काय घडलं? 


एका पोलीस अधिकाऱ्यानं माहिती देताना सांगितलं की, आरोपींपैकी एका मुलानं पीडितेशी इंस्टाग्रामवर मैत्री केली होती. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्यानंतर दोघांनी भेटायचं ठरवलं. 30 एप्रिल रोजी तरुणानं तिला आपल्या घरी नेलं आणि तिथे त्यानं मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा 4 मे रोजी आरोपीनं आणखी एका तरुणासोबत पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. अत्याचार झाल्यानंतर मुलगी घरी पोहोचली, त्यावेळी तिची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केल्यावर पीडितेनं घटलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली. 


पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पालघर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार) आणि इतर संबंधित तरतुदी आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. आणि त्यानंतर सोमवारी दोन्ही आरोपींना तलासरी येथे धाड टाकून अटक केली. 


आरोपींकडून ओळख लपवण्यासाठी बनावट नावांचा वापर 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी फरार झाले होते. तसेच, ओळख लपवण्यासाठी त्यांनी बनावट नावांचाही वापर केला होता. परंतु, पोलिसांनी दोघांचा कसून शोध घेतला आणि पाळत ठेवून त्यांना पकडलं. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. दोन्ही आरोपींना 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.