गाझियाबाद : देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्साही व भक्तीमय भावनेने मंदिरात जात असतात. आपली श्रद्धेचं आत्मिक समाधान मंदिर किंवा देवालयातील दर्शनाने होत असते. अनेकदा येथील महाराज, बाबा, वुबा यांचीही भक्ती भाविकांकडून केली जाते. मात्र, अशाच बाबा-बुवांमधील विकृत वृत्ती बाहेर येते तेव्हा समाजातून तीव्र संताप व्यक्त होतो. गाझियाबादमधील (Gaziyabad) मिनी हरिद्वार म्हटलं जाणाऱ्या शनि मंदिरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंगनहर घाटावरील प्राचीन शनि मंदिरातील महंत मुकेश गोस्वामीविरुद्ध एका महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. येथील गंगा घाटावर महिलांच्या वस्त्र बदलण्याच्या ठिकाणावर छुपा कॅमेरा बसवून हा महंत मोबाईलवर तेथील चित्रण पाहत होता. 


मुरादनगरच्या एका गावातील पीडित महिलेने याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानतंर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यानंतर, महंत मुकेश गोस्वामीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गंगा घाट परिसरात पाहणीसाठी दौरा केल्याचे समजताच हा महंत पळून गेला आहे. 21 मे रोजी दुपारी आपल्या मुलीसह पीडित महिला गंगा घाटावर स्नान करण्यासाठी आली होती. अंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी ही महिला तेथे सोय करण्यात आलेल्या ठिकाणी गेली. येथील घाटावर महिलांना कपडे बदलण्यासाठी उपलब्ध असलेल्या रुममध्ये वरील बाजूस कॅमेरा असल्याचे महिलेने पाहिले. त्यानंतर, महिलेनं लगेचच रुममधून बाहेर येऊन संताप व्यक्त केला. त्यावेळी, रुममधील हा कॅमेरा महंत मुकेश गोस्वामी यांच्या मोबाईलशी कनेक्ट असल्याची माहिती मिळाली. 


पीडित महिलेने थेट महंतांकडे यासंदर्भात विचारणा केली असता महंत गोस्वामीने अरेरावीची भाषा केली, महिलेस अवमानजक शब्दात सुनावले. तसेच, याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास परिणाम वाईत होतील, अशी धमकीही दिली. मात्र, महिलेने महंताच्या धमकीला भीक न घालता, मुरादनगर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी गंगा घाट परिसरात धाव घेऊन कॅमेऱ्याची तपासणी केली. तसेच, महंत गोस्वामीबद्दल विचारपूस केली. त्यानंतर, आरोपी मंहताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच महंत गोस्वामी फरार झाला आहे. 


मोबाईल व डीव्हीआर जप्त


दरम्यान, पोलिसांनी गंगा घाटावर मंहताने उभारलेल्या अवैध दुकानांवर जेसीबी चालवून कारवाई केली. येथील महंताची पाच दुकाने पाडण्यात आली आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर, महंत मुकेश गोस्वामीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक नेमले असून मोबाईल व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी नरेंद्र कुमार यांनी दिली आहे.  


महंतांवर यापूर्वी 4 खटले दाखल 


महिलांच्या कपडे बदलण्याच्या रुममध्ये कॅमेरा लावण्यात आला नव्हता. तेथील माकडांनी हा कॅमेरा फिरवला. त्यामुळे, कॅमेऱ्याच्या फोकस एकदम रुममध्ये गेल्याचं महंतांनी म्हटलं. विशेष म्हणजे महंताने तक्रारदार महिलेची माफीही मागितली आहे. दरम्यान, या मंहतांवर यापूर्वी 4 खटले दाखल आहेत, त्यापैकी एक खटला फसवणुकीच्या कलमान्वये दाखल आहे. तर, वन अधिनियमान्वये इतर खटले दाखल आहेत.