मुंबई : ऑनलाईन फसवणूक झालेल्या रकमेपैकी 2.27 लाख रुपये गोल्डन अवरमध्ये परत करण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी ओशिवारा पोलिसांनी केली आहे. पूजा केतन शहा या महिलेची मिठाई खरेदीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. त्यावर पोलिसांनी ही कामगिरी केली.


काय आहे प्रकरण? 


श्रीमती पूजा केतन शहा (वय 49 वर्षे)  यांनी दिवाळीसाठी स्वीट घेण्याकरिता त्यांच्या मोबाईल मधील झोमॅटो ॲपवर स्वीट अंधेरी पश्चिम मुंबई असे सर्च केलं. त्यानंतर त्यांना तिवारी स्वीट मार्टचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. तक्रारदार यांनी एक हजार रुपयाचे स्वीट विकत घेऊन सदरची पेमेंट ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते झाले नाही. म्हणून झोमॅटो ॲपवर प्राप्त झालेला तिवारी स्वीटच्या मोबाईल क्रमांकावर
संपर्क साधला. त्यानंतर समोरील व्यक्तीने तो तिवारी स्वीट मधून बोलत असल्याचे सांगितले. 


तक्रारदार महिलेने त्याच्याकडून एक हजार रुपयांचे स्वीट खरेदी केले आणि सदरची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले. तेव्हा नमूद मोबाईल धारकाने बिलाची रक्कम स्वीकारण्याकरता त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला क्रमांक द्यावे लागेल असे सांगितले. तक्रारदार महिलेने सांगितल्याप्रमाणे केलं असता तिच्या क्रेडिट कार्ड मधून एकूण 2.40 रुपये वजा झाल्याचा एसएमएस आला.


तेव्हा तक्रारदार महिलेने तिची ऑनलाईन फसवणूक केल्याबाबतची तक्रार केली. ओशिवारा पोलिसांनी गु र क्र 1470/22 कलम 419, 420 भादवीसह 66(क) (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तात्काळ तपास सुरू केला.


पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे PAYTM, phonepe, Flipkart पेमेंट ॲपच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करुन आणि ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून श्रीमती पूजा शहा यांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी 2.27 लाख रुपये परत मिळवले. सदरची रक्कम श्रीमती पूजा शहा यांना यांना परत देण्यात आली.