Nawab Malik :  मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिलपर्यंत कोर्टाने वाढ केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. नवाब मलिक यांच्या विनंतीवरून त्यांना काही वस्तू वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 


नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता मलिक यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती. 


नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?  


नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 


नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.


मलिक यांच्या मुलाकडे पैशांची मागणी 


ईडीच्या (ED) कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन मिळून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या विरोधात मलिक यांच्या मुलाने गुन्हा दाखल केला आहे. अमीर मलिक यांच्या तक्रारीवरून व्हीबी नगर पोलिसांनी इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: 


नवाब मलिक 'बिनखात्याचे मंत्री';'या' मंत्र्यांकडे दिला नवाब मलिकांच्या खात्याचा पदभार