Sushilkumar Shinde Mobile Theft : चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. मात्र कितीही शक्कल लढवल्या तरी हे चोर अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. तर कधी कधी चोराचं नशीब जास्तच वाईट असेल, तर तो चोरी करता करताच पकडला जातो. असंच काहीसं घडलं आहे. चोरी करताना नेमका चोर पकडला गेला आणि तेही एका माजी केंद्रीय मंत्र्याचा फोन चोरी करताना. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मोबाईलवर हात साफ करताना एकाला चोराला रंगेहाथ पकडण्यात आलं. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील (Siddheshwar Express) प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे.


माढा तालुक्यातील एका मोबाईल चोराने चक्क माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मोबाईलवर हात घालण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या दुर्दैवाने या माजी मंत्र्यानेच या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. माढा तालुक्यातील घाटणे येथील ही घटना समोर आली आहे. या चोराचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य असून गावाचे गुरव असल्याचंही म्हटलं जात आहे. याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


काही कामानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे हे दोघे 6 ऑक्टोबर रोजी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. शिंदे यांचे आरक्षण गाडी नंबर 12116 सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील HA - 1 या बोगीत होतं. शिंदे यांचा सोलापूर येथून रात्री प्रवास सुरु झाला होता. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दादर स्टेशनवर येण्यापूर्वी शिंदे हे बाथरूममध्ये गेले असता, मंदार गुरव हा शिंदे यांच्या सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला शिंदे यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. यावेळी शिंदे यांच्या सेवेत असणाऱ्या गावकर या पोलीस कर्मचाऱ्याने दादर रेल्वे पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मंदार गुरव (वय 23, रा घाटणे , ता माढा) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यावेळी आरोपी मंदार गुरव याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. दस्तुरखुद्द माजी केंद्रीय गृहमंत्र्याचाच मोबाईल चोरीचे धाडस करणाऱ्या या चोराला पकडून ठेवायचं धाडस सुशीलकुमार शिंदे यांनी दाखवले हे विशेष. मंदार प्रमोद गुरव हा माढा तालुक्यातील घाटणे गावाचा रहिवासी असून तो या गाडीत मुंबईला कशाला चालला होता, त्याने अजून किती जणांचे मोबाईल चोरले या सर्व प्रकारचा तपास आता दादर रेल्वे पोलीस करीत आहेत. मात्र वडील राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील मानकरी असणारे गुरव असताना मुलाला का अशी दुर्बुद्धी सुचावी अशी चर्चा माढा तालुक्यात रंगली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या