Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील (Navi Mumbai) हॉटेलमध्ये 12 जणांच्या टोळक्याने दोन रेल्वे पोलिसांना (GRP Constable) मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सर्व 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित दहा जणांचा शोध सुरु आहे. नवी मुंबईतील कोपर खैरणेमधील क्वॉलिटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये मागील आठवड्यात हा प्रकार घडला होता. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.


क्वॉलिटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन रेल्वे पोलीस तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्या 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्या आवाजात बोलण्यास आणि अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाजूला बसलेल्या रेल्वे पोलिसांनी मोठ्या आवाजात बोलण्यावरुन आणि शिवीगाळ करण्यावरुन हटकलं. यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. मग वाद एवढा टोकाला गेला की या टोळक्याने दोन्ही पोलिसांवर हल्ला केला.


प्लेट, टेबल, खुर्च्या, बाटल्यांनी मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलीस दीपक कोल्हे (वय 41 वर्षे) आणि त्यांचा मित्र गुरुवारी (24 नोव्हेंबर) रात्री उशिरा कोपर खैरणेच्या सेक्टर 14 मधील क्वॉलिटी पंजाब हॉटेलमध्ये जेवत होते. दरम्यान, शेजारील टेबलवर आणखी दोन लोक दारु पीत होते. याचदरम्यान एकाला फोन आला आणि मोठ्या आवाजात बोलणं आणि शिवीगाळ सुरु झाली. यावरुन पोलिसांनी त्यांना  हटकलं आणि त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. यानंतर 12 जणांच्या टोळक्याने दोन्ही जीआरपी कॉन्स्टेबलना मारहाण करण्यास सुरुवात केली. टेबल, खुर्च्या आणि बिअरच्या बाटल्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाली आहेत. 


काही हल्लेखोर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
मारहाणीनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. रेल्वे पोलिसांच्या तक्रारीनंतर कोपर खैरणे पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम 395, 397 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या 12 पैकी 2 जणांना अटक करण्यात आली असून इतर दहा आरोपींचा शोध सुरु आहे. हल्लेखोरांपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर हॉटेलमध्ये दारु कशी काय दिली जात होती किंवा सेवन केली जात होती आणि यासाठी त्यांच्याकडे परवाना आहे की नाही, याचाही तपास पोलीस करत आहेत.


मारहाणीची ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिथे रेल्वे पोलिसांवरच हल्ला होतो तर सामान्यांनी काय करायचं असा प्रश्न विचारला जात आहे.