Navi Mumbai : सख्खा भाऊ पक्का वैरी... या म्हणीची प्रचिती नवी मुंबईमध्ये आली आहे. होय... संपत्तीच्या वादातून भावानेच भावावर जिवघेणा हल्ला केलाय. मालमत्तेत वाटा द्यायला नको म्हणून सख्या भावानेच आपल्या भावाच्या मानेत चाकू घुसवून त्याला जागीच ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून तेजस पाटील याचा प्राण वाचविण्यात डॅाक्टर यशस्वी झाले. सानपाडा सेक्टर-5 मध्ये राहणाऱ्या तेजस जयदेव पाटील याच्या घरामध्ये शनिवारी सकाळी  तेजसच्या मानेवर वार करण्यात आले. तेजसचा लहान भाव मोनिश पाटील याने आपला साथीदार महेश कांबळे याला घेवून हा जीवघेणा हल्ला केला होता. दोघांनी तेजसवर चाकू आणि कोयत्याने वार केले. सकाळी झोपलेल्या आवस्थेत असलेल्या तेजसच्या मानेत उजव्या बाजूने चाकू खुपसला. तर डोक्यात कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, असता यावेळी तेजस पाटील याने जोरदार प्रत्यत्तर दिल्याने आरोपी पळून गेले. 


दरम्यान मानेत उजव्या बाजूला  घुसलेला चाकू तसाच ठेवत बाईक वरून तेजस पाटील याने सानपाडामधील एमपीसीटी रूग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्यावर रूग्णालयात त्वरीत उपचार करण्यात आले, त्यामुळे तेजस पाटील याचे प्राण वाचले. तेजसच्या मानेत चाकू खुसला असला तरी मेंदूत जाणारी मुख्य रक्तवाहिनी कापली न गेल्याने आणि मानेच्या डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीतून रक्तपुरवठा सुरळीत राहिल्याने जीवावर बेतले नाही. दरम्यान या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी मोनिश पाटील आणि महेश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून ते फरार झाले आहेत. 


तेजस पाटील याच्या मानेत चाकू घुसला होता तेव्हा त्याने तो काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र तो जास्त आत गेला असल्याने तेजसने एमपीसीटी हॅास्पीटल गाठले होते. रूग्णालयात दाखल होताच त्वरीत तेजसवर उपचार सुरू करण्यात आले.  डॉ आदित्य पाटील ( न्युरो सर्जन ) , डॅा मोनियल अजय भुता (इंटरव्हेश्नल रेडियोलॅाजिस्ट), डॅा विनोद पाचार्डे( प्लास्टिक सर्जन ) , डॅा भास्कर( कॅडिओक सर्जन ) या चार डॅाक्टरांच्या टीमने तेजसवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. 


मानेमध्ये उजव्या बाजूला घुसलेला चाकू  खोल गेला होता.  मानेवरून चाकू काढताना, आजूबाजूचा कोणताही भाग किंवा नस किंवा धमनीला इजा पोचणार नाही ना ? याची काळजी घेण्यात आली. असे झाल्यास कायमचे अपंगत्व किंवा जीवाला धोका निर्माण झाला असता. मानेत खुसलेला चाकू थेट मनक्याच्या हाडात जावून घुसला होता. बाहेर काढताना ताकद लावून काढावा लागला. यावेळी मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्यांना इजा न झाल्याने रूग्णाचा मृत्यू झाला नाही. किंवा यावेळी आर्धांगवायूचा झटका आला नाही. ही शस्त्रक्रिया चार तास चालली होती. शस्त्रक्रियेनंतर तेजस पाटील याला आयसीयू मध्ये ठेवला होता. सद्या तो आयसीयू मधून बाहेर आला असून व्यवस्थित बोलत आहे. त्याच बरोबर त्याला जेवण करण्यात कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही.