नांदेड :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) कंबर कसली असून, भाजपचे केंद्रीय नेते थेट मैदानात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) बालेकिल्ल्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची भाजपने रणनिती आखली आहे. नांदेडमध्ये भाजपने येत्या 10 जूनला अमित शहा यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त 1 ते 30 जून दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 10 जून रोजी नांदेडमध्ये येत असून त्यांची सायंकाळी 5 वाजता अबचलनगर, बाफना येथे जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, यासंबंधी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर भाजप पदाधिका-यांची बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत जिल्हा,मंडळ शक्ती केंद्र व बूथ पातळीवर वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम घेत सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. यामध्ये संपर्क से समर्थन यापासून हे अभियान सुरु झाले.या अभियानात सर्व नेते, मंत्री सहभागी घेणार असून देशपातळीवर एका मंत्र्याला दोन लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा 10 जून रोजी नांदेड दौरा आयोजित करण्यात आला आहे, असे भाजप प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी सांगितले.
सभेची भाजपकडून तयारी सुरू
नांदेड हा अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे. मविआ एकत्र लढल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करून अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढवण्याचा इरादा आहे. अबचलनगर भागातील खुल्या मैदानात ही सभा होणार असून, त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या सभेला पन्नास हजारांहून अधिकचे लोक उपस्थित राहतील असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
भाजप प्रस्थापितांना धक्का देण्याच्या तयारीत
मोदी @ 9 च्या माध्यमातून ज्या ठिकाणी भाजप कमजोर आहे त्याठिकाणी भाजपचे मोठे नेते उतरणार आहेत. त्यामुळे भाजपला या रणनितीचा किती फायदा होईल याचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळेल..तुर्तास तरी भाजप प्रस्थापितांना धक्का देण्याच्या तयारीत आहे हे मात्र नक्की आहे