Nashik NEET Paper Leak: देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा यंदा पेपरफुटीच्या वादंगात अडकली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नाशिकपर्यंत पोहोचले असून, पोलिसांच्या तपासात अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या (Nashik) एका 30 वर्षीय संशयित आरोपीने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली होती आणि ती पुढे तब्बल 15 लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले आहे.
तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटी प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. नाशिकच्या संशयित आरोपीने, ज्याची स्वतःची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी आहे, 10 लाख रुपये मोजून प्रश्नपत्रिका मिळवली. त्यानंतर नफ्याची संधी साधत त्याने हीच प्रश्नपत्रिका 15 लाख रुपयांना विकली. हा व्यवहार झाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखी पसरली, ज्यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे संपुष्टात आली.
NEET Paper Leak: पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न फसला
अटक करण्यात आलेला 30 वर्षीय युवक मूळचा नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून त्याने BAMS चे शिक्षण घेतले आहे. राजस्थान सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, अटकेपासून वाचण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी आरोपीने आपली हेअरस्टाईल देखील बदलली होती. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला शिताफीने बेड्या ठोकल्या.
NEET Paper Leak: नाशिक ते हरियाणा: पेपर फुटीची साखळी
तपासात असे समोर आले आहे की, नीट पेपरची पहिली लीक कॉपी नाशिकमध्ये उपलब्ध झाली होती. येथून ही प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, जिथे त्याचे 10 वेगवेगळे सेट तयार करण्यात आले. त्यानंतर हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी विस्तारली गेली. जयपूरमधील मनीष नावाचा व्यक्ती या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. या पेपरफुटीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून त्यांच्यात तीव्र संतापाची लाट आहे. सीबीआय आता या प्रकरणातील 13 संशयितांची सखोल चौकशी करत असून यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI