लातूर : नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा रद्द करून (NEET Exam Cancelled) पुन्हा घेण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला हे प्रकरण राजस्थानातील शेखावाटी परिसरापुरते मर्यादित असल्याचे सांगितले जात होते. मात्र चौकशीचा विस्तार होत गेल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका मागील दोन वर्षांपासून मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतून नीटची तयारी केली होती. परीक्षा चांगली गेल्याने चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण
खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरत आहे. पुन्हा शहरात जाऊन राहणे, हॉस्टेलचा खर्च करणे, क्लासेस किंवा टेस्ट सिरीज जॉईन करणे, यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंता वाढली आहे.
दोन वर्षांची मेहनत सफल झाली असे वाटत असतानाच पुन्हा परीक्षा द्यावी लागणे खूप वेदनादायक आहे. वारंवार पेपर लीकच्या घटना घडत असतील, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या विश्वासाने तयारी करावी? ही केवळ परीक्षा व्यवस्थेची चूक नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि मानसिकतेशी खेळ आहे, असे मत सारंग गावडे यांनी व्यक्त केले.
परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडिया, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर फिरत होता, ही अतिशय धक्कादायक बाब आहे. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेचा हलगर्जी कारभार समोर आला असून याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे. अनेक विद्यार्थी तीन-तीन वर्ष मेहनत घेतात, मात्र अशा घटनांमुळे त्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे, असे मत विद्या आराधना संस्थेचे डायरेक्टर सतीश पवार यांनी व्यक्त केले.
आयआयबी क्लासचे डायरेक्टर संतोष पाटील यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. “मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या कष्टाने शिक्षण घेतात. आई-वडील मोठ्या मेहनतीने पैसा उभा करून मुलांना शिकवतात आणि त्यांच्या भविष्यासाठी स्वप्न पाहतात. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे. यापुढे पेपरफुटी होणार नाही, याची कठोर काळजी घेतली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लातूर सारख्या एज्युकेशन हब मध्ये राज्यभरातून विद्यार्थी येथे येत असतात. येथील महाविद्यालय खाजगी शिकवणी केंद्र यात भविष्य शोधणारे या तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. पुढील अनेक वर्ष याचा प्रभाव राहील असं बोललं जातंय.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI