नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून पब्लिसिटी स्टंट करणे किंवा आपले फॉलोअर्स वाढविण्यासाठी वेगळेच चाळे करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. काही शहरांत रिल्सच्या माध्यमातून तरुणाई दहशत पसरवण्याचंही काम करताना दिसून येते. गावात आपलं किती वजन आहे, किंवा हाती चाकूसह शस्त्रास्त्रे घेऊन दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, पोलिसांना ही बाब लक्षात येताच पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नाशिकच्या पेठ रोडपरिसरातील तवली फाट्यावरही अशीच एक घटना घडली. हातात हत्यारे घेत मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशनचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर हत्यार घेऊन बर्थडे सेलिब्रेट करणाऱ्या चौघांना नाशिक पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. 


शहराच्या पेठ रोड येथील तवली फाटा परिसरात कथित भासक्या डॉन नावाच्या युवकाने बर्थडे (Birthday) सेलिब्रेट करताना हातामध्ये हत्यारे घेऊन मित्रांसोबत काही रिल्स बनवली, त्यानंतर त्या रिल्स सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आल्या आहेत. मग, ह्या रील्स पोलिसांच्या हाती लागताच त्या स्वयंघोषित डॉन आणि भाईंचा शोध घेत नाशिक पोलिसांच्या (Police) गुंडा विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली. गुंडविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने तवली फाटा येथील चार युवकांना ताब्यात घेतले. ज्या सोशल मीडियाच्या ॲप्सवर या रिल्स व्हायरल केल्या होत्या, त्याच अॅपवर या तरुणांना माफी मागावी लागली. तसेच, अशा प्रकारच्या रिल्स येथून पुढे बनवणार नसल्याचे त्यांच्याकडून लिहूनही घेतले. 


दरम्यान, सध्या राजकीय आणि सामाजिक तणाव असल्याने सोशल मिडिया अकाऊंटवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे, सोशल मीडिया अकाऊंटवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही अशा प्रकारच्या रिल्स किंवा हातात हत्यारे बाळगून व्हिडिओ बनवू नये, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


हेही वाचा


अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले...