अहमदनगर : पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अशी खोटी प्रमाणपत्रे देणारे रॅकेट चालत असल्याचं समोर आलंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून (Ahmednagar Civil Hospital) याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी दोन जण रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आहेत तर चौघांनी अपंगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनवल्याच समोर आलंय. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवार माहिती भरली. त्याद्वारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक) डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या बनवेगिरीच्या साखळीमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयातीलच काही कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रसाद संजय बडे (पाथर्डी), सुदर्शन शंकर बडे (पाथर्डी), सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे (माणिकदौंडी, पाथर्डी) योगेश बनकर (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) गणेश गोत्राळ (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय तपासणी न करताच दिली प्रमाणपत्र
दरम्यान, शहरातील सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले जात असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. त्यांनी वरील चौघांची नावेही संशयित म्हणून तसेच त्यांनी कर्णबधिर असल्याचे दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र घेतल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाने अंतर्गत चौकशी केली. त्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या दिवशी रजिस्टरला कोणतेही संबंधित व्यक्तींना प्रमाणपत्र दिले नसल्याचे तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली नसल्याचे उघड झाले. मात्र पोर्टलवर या चौघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद आढळली. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा रुग्णालय प्रशासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा
UPSC : बनवाबनवीचा कळस! पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी