Nashik Crime News : नाशिक शहरात गुंडांचा हैदोस सुरूच आहे. टवाळखोरांनी सिडको (Cidco) परिसरातील महाकाली चौक उद्यातील जॉगिंग ट्रॅकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV Camera) तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यामुळे सिडको आणि सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून उद्याने, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर (Nashik Police) आहे. आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरातील सिडको, सातपूर या परिसरात चौकाचौकात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. उद्याने, क्रिडांगण, मोकळी मैदान या परिसरात गुंडांची दहशत कायम असल्याचं दिसून येत आहे. सिडकोतील महाकाली चौक येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात महापालिकेने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आठ ते दहा टवाळखोरांच्या टोळक्याने दगडफेक करून तोडफोड केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 


नाशिक पोलीस काय कारवाई करणार?


दिवसेंदिवस टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक हे भयभीत असून या गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभे ठाकले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडतानाचा व्हिडिओ समोर आल्याने आता सिडकोतील गुंडांवर नाशिक पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


साईभक्तांना वावी परिसरात लुटलं


दरम्यान, सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी शिवारात शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पुणे येथील भक्तांच्या कारला समोरून कार आडवी लावत चौघांनी हत्याराचा धाक दाखवत 4 तोळ्यांचे दागिने व 25 ते 30 हजारांची रोकड काढून घेत लुटल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेने साईभक्तांमध्ये दहशत पसरली आहे. यानंतर साईभक्तांनी वावी पोलिस ठाणे गाठत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, अवघ्या काही तासात बाळ आईच्या कुशीत!


Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश