Nashik Nandgaon News नांदगाव : अलिकडच्या काळात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दुचाकींची चोरी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या तब्बल 16 दुचाकी हस्तगत करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. दुचाकी चोरणाऱ्या तिघा संशयितांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकार उपस्थित होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर शांतीलाल कायस्थ यांची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स दुचाकी (एम.एच.41 बी.के.1088) ही चोरी गेली होती. कायस्थ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच इतरही दोन दुचाकी चोरल्याच्या घटना नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या होत्या.
तपासाची चक्रे फिरवली
त्यानंतर तत्कालीन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पथकाची नेमणूक करून वेगाने तपास करून गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर यांनी तपासाची चक्रे फिरवली.
तिघांना घेतले ताब्यात
पोलिसांनी संशयित अंकुश दादासाहेब गायकवाड (रा.नांदुर ता.नांदगांव ) यास ताब्यात घेतले. त्याचा दुसरा साथीदार पवन शंकर आहिरे (रा. निंबायती ता. मालेगांव) यास शिरपुर (जि.धुळे) येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले तर तिसरा संशयित आरोपी हर्षल मनोहर गवारे यास शिवकृपानगर, राजविलास सोसायटी, बोरगड म्हसरुळ येथून ताब्यात घेतले.
16 दुचाकी चोरल्याची दिली कबुली
या तिघांची सखोल चौकशी केली असता या तिघांच्या टोळीने नांदगांव पोलीस ठाणे हद्दीत चार, येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन, येवला तालुका, मनमाड, लासलगांव, मालेगांव व छावणी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक, पोलीस आयुक्तालय नाशिक शहर घटकातील पोलीस ठाणे हद्दीत सहा अशा एकूण 16 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीकडून १6 दुचाकी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हस्तगत केल्या आहेत.
'या' पथकाने केली कारवाई
अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, मनोज वाघमारे, पोलीस हवालदार विनायक जगताप, धर्मराज अलगट, भारत कांदळकर, मुदस्सर शेख,अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, दत्तू सोनवणे, दिपक मुंडे, सागर बोरसे, साईनाथ आहेर, परदेशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दुचाकी मिळाल्याने पेढे वाटून साजरा केला आनंद
मनमाड पोलीस ठाणे हद्दीतील ललित बडगुजर यांची दुचाकी 31 डिसेंबरला चंद्रभागा लॉन्स येथून चोरी गेलेली होती. एक महिना तपास करूनही गाडी मिळत नसल्याने बडगुजर कुटुंब व्यथित होते. ही गाडी ललित यांच्या आजीने घेवून दिल्याने त्या दुचाकीसोबत त्यांच्या भावना जडलेल्या होत्या. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी ललित बडगुजर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून तुमची दुचाकी सापडली असल्याचे कळविले. बडगुजर यांना दुचाकी सापडल्याचा एवढा आनंद झाला की, त्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात पेढे वाटत आनंद साजरा केला. आमच्या भावना त्या दुचाकीशी जोडल्या गेलेल्या होत्या. नव्याने दुसरी दुचाकी घेणे आमच्या परिस्थितीनुसार अशक्य होते असे सांगताना ललित यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते.
आणखी वाचा