मुंबई : वनराई परिसरात एक हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी एका 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरला होता. त्यामध्ये प्रायव्हेट व्हिडीओ सापडल्यानंतर चोराने त्या ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि लाखोंची मागणी केली. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दावा केला आहे की चोरट्याने त्याच्याशी संपर्क साधला आणि धमकी दिली की जर एक लाख रुपये दिले नाहीत तर ते फिर्यादीच्या पत्नीचा खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतील.
तक्रारदाराचा मोबाईल 3 जुलै रोजी चोरीला गेला होता आणि आरोपीच्या मोबाईलवरून त्याला हा व्हिडीओ आला असावा. अजय झा असं तक्रारदार व्यक्तीचं नाव आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला आहे.
3 जुलै रोजी अजय झा हा अंधेरी (पश्चिम) येथे सामानाची डिलिव्हरी करत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याची तक्रार त्याने आंबोली पोलीस ठाण्यात दिली होती.
मेमरी कार्डमधील व्हिडीओ हाती लागले
तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, "26 जुलै रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास त्याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यामध्ये अहमद खान असं नाव त्याने सांगितलं. मोबाईलच्या मेमरी कार्डमध्ये त्याला काही प्रायव्हेट व्हिडीओ सापडले. त्यामध्ये त्याच्या पत्नीचेही प्रायव्हेट व्हिडीओ असल्याचं त्याने सांगितलं.
त्यानंतर कॉलरने अजय झा याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि असे न केल्यास तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू अशी धमकी दिली.
एक लाख रुपयांची मागणी
फिर्यादीचा आरोप आहे की, तेव्हापासून त्याला अनेक कॉल येत आहेत. परंतु 30 जुलै रोजी आरोपीने त्याच्याशी संपर्क साधला आणि सांताक्रूझ येथील रेट्रो रेस्टॉरंटमध्ये भेटण्यास सांगितले. जेव्हा तो त्याला भेटला तेव्हा त्याने मोबाईलमधील पत्नीचा खाजगी व्हिडिओ दाखवला. तसेच हा व्हिडीओ त्याने एका मित्रालाही फॉरवर्ड केल्याची माहिती त्याने दिली.
हा व्हिडीओ हवा असेल तर एक लाख रुपये दे अशी मागणी आरोपीने फिर्यादीकडे केली. तसे न केल्यास तो व्हिडीओ दोन लाख रुपयांना विकण्याची धमकी दिली.
दहा दिवसांचा वेळ दिला
हा व्हिडीओ कुठेतरी पोस्ट केला जाईल अशी भीती फिर्यादीला होती.त्यामुळे त्याने आरोपीकडे पैसे जमा करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला आणि आरोपीनेही तसा वेळ दिला. पण त्यामुळे एवढी रक्कम जमा करणे अवघड होते. त्यांने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.
अजय झा याच्या तक्रारीच्या आधारे वनराई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि अंधेरीतील ओशिवरा येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हाच मोबाईल चोर होता का याचा शोध घेत आहेत.
ही बातमी वाचा: