Nashik Crime News : नवीन नाशिक (New Nashik) परिसरातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. दुकानातील वस्तू पडल्याच्या कारणावरून 8 वर्षांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नाशिक परिसरातील पवन नगर (Pawan Nagar) येथील एक आठ वर्षीय मुलगा लकी गिफ्ट स्टोअर या दुकानात वही आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्याकडून चुकून दुकानातील एक वस्तू खाली पडल्या. या कारणावरून दुकानदाराला प्रचंड राग आला.
दुकानदाराकडून चिमुकल्याला बेदम मारहाण
वस्तू तू का खाली पाडली, असे म्हणत दुकानदाराने चिमुकल्याला अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण केली तसेच त्याला डांबून ठेवण्यात आले. यानंतर मुलगा रडत घरी आल्यानंतर मुलाने आपल्या वडिलांना आपबिती सांगितली. वडील मुलाला सोबत घेऊन दुकानदाराकडे पोहोचले. दुकानदाराकडे विचारपूस केली असता त्याने वडिलांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्या मुलाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणाची हत्या
दरम्यान, जागेच्या वादातून मामाने साथीदारांसह मिळून भाच्यावर गोळीबार करीत खून केल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनप्रकरणी संशयित मामास अटक केली आहे. निलेश रामचंद्र परदेशी (41, रा. पाचआळी, त्र्यंबकेश्वर) असे खुन झालेल्या भाच्याचे नाव आहे. निलेश परदेशी यांची निलगिरी पर्वतामागे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. जव्हार रोडवरील भगवती नगर रोड नावाच्या कमानीजवळील जमिनीच्या मालकी हक्कावरून परदेशी आणि त्यांचे मामा गोविंद रामा दाभाडे यांच्यामध्ये वाद सुरु होते. वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. निलेश परदेशी हे शनिवारी सायंकाळी त्यांच्या शेतजमिनीत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर मारेकऱ्यांनी बंदुकीतून गोळीबार केला. तीन गोळ्या शरीरात घुसल्याने निलेश जागेवरच कोसळले. घटनेनंतर मारेकरी तेथून पसार झाले. निलेश यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या