Nashik Crime News नाशिक : महाविद्यालयातील शिपायाने विद्यार्थी आणि पालकांना महाविद्यालयाच्या बँक खात्याचा नंबर न देता विविध शैक्षणिक फीची जमा झालेली रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करत तब्बल 44 लाख 8 हजारांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये (Bhonsala Military School, Nashik) हा प्रकार घडला असून विलास भास्कर आहेर (Vilas Bhaskar Aher) असे या संशयित शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2023 ते डिसेंबर 2023 या सात महिन्यात महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु होती. यावेळी महाविद्यालयातील लेखा विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेला विलास आहेर याने स्वतःच्या बँकेचे खाते महाविद्यालयाचे असल्याचे भासवले.  


शैक्षणिक फी स्वतःच्या खात्यात केली वर्ग


शिपायाने विद्यार्थी व पालकांकडून जमा केलेली शैक्षणिक फी स्वतःच्या खात्यात वर्ग केली. तर काही विद्यार्थ्यांची फी जमा न झाल्याने महाविद्यालयाने विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी फोन पे द्वारे फी जमा केल्याचे सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाच्या लेखा परीक्षणामध्ये हा प्रकार उघडकीस आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 


पैसे काढून देण्याच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक


पैसे काढत असताना वृद्धाकडील एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे त्यांच्या खात्यातील 30 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वामन देवराम कटारे (79, रा. समतानगर, गांधीनगर) हे बोधलेनगर येथील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना पाठीमागे उभ्या असलेल्या अज्ञात इसमाने "मी तुमचे पैसे काढून देतो," असे बोलून त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन पीन नंबर विचारला. त्यावेळी एटीएम कार्ड टाकले असता पैसे निघाले नाहीत. त्यानंतर कटारे यांनी बँकेचे स्टेटमेंट काढून पाहिले असता त्यांच्या लक्षात आले, की अज्ञात इसमाने त्याच्याकडील एटीएम कार्डाची हातचलाखीने अदलाबदल करून त्याद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून 30 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश


Nashik Crime : मित्रांनीच केला मित्राचा घात, गंजमाळ परिसरातील 'त्या' प्रकरणाचा अखेर उलगडा, तिघांना बेड्या