Nanded Crime News  : नांदेड शहरातील कर्मवीरनगर परिसरात लग्न समारंभात डीजे वाजवण्याच्या कारणावरून तरुणाचा  निर्दयीपणे खून करण्यात आलाय.  शेख मोईन (वय, 22) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. हत्येनंतर मोईनच्य कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु, पोलिसांनी कुटुंबीयांनाच ताब्यात घेतले. खून करणाऱ्याला वाऱ्यावर सोडून मयताच्या भाऊ आणि वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केलाय. ही घटना काल रात्री नांदेडमधील नमस्कार चौक परिसरातील कर्मवीर नगर येथे घडली आहे.  


नांदेडमधील कर्मवीर नगर येथील शेख कुटुंबातील विवाह सोहळ्याचा काल स्वागत समारंभ होता. या स्वागत समारंभासाठी डीजे सांगण्यात आला होता. परंतु, डीजे लावण्याच्या कारणावरून तरूणांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की,  सात ते आठ तरुणांनी शेख मोईन शेख याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात मोईनचा जागीच मृत्यू झाला.    


मृत पावलेल्या युवकाचे वडील, भाऊ, चुलत भाऊ आणि मामांनाच पोलिसांनी अटक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मोईनचा मृतदेह प्रेत विमानतळ पोलिस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन केले. मृतदेह पोलिस ठाण्यात आणल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


दरम्यान, नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार  खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास सोडून मृताच्याच नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नातेवाईकांना सोडून द्यावे, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतलाय.  याविषयी पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तूर्तास यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. या प्रकरणामुळे नांदेड शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत मोईन याच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबत देखील अद्याप माहिती मिळालेली नाही. 


महत्वाच्या बातम्या


BMC अधिकारी असल्याचं सांगत 10 हजारांची लाच मागितली, नंतर केला चोरीचा प्रयत्न, आरोपी अटकेत