नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीच्या रडारवर नागपूरातील काही श्रीमंत व्यापारी होते. या दरोडेखोरांनी काही श्रीमंत व्यक्तींच्या घराची रेकी देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे.
श्रीमंत लोकांच्या घरी दरोडा टाकायचा आणि संधी मिळतात त्यांचे अपहरण करण्याच्या तयारीत ही टोळी होती. विशेष म्हणजे या टोळीकडून एक पिस्तूल, चार जिवंत काडतूस, काही धारदार शस्त्रं, वॉकी टॉकी, मोबाईल फोन आणि दरोड्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पथक 6 डिसेंबरच्या पहाटे गस्तीवर असताना नवीन सुभेदार लेआउट परिसरात काही तरुण संशयास्पद स्थितीत उभे दिसले. त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या जवळ गेले असता त्यांनी तिथून दुचाकीवर बसून पळ काढला. पोलिसांनी अनेक किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग केला.
पळून जाताना अपघात
वाठोडा रिंग रोड परिसरात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दरोडेखोरांच्या वाहनाचा अपघात झाल्याने काही दरोडेखोर गंभीर जखमी झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आधी त्यांच्यावर उपचार करून घेतले. जेव्हा या संशयितांची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यापैकी दोघे मध्यप्रदेश मधील सराईत दरोडेखोर असल्याचे समोर आले.
नागपुरच्या सहकाऱ्यांनी मध्यप्रदेशातून बोलावले
नागपूरमध्ये राहणाऱ्या काही सहकाऱ्यांनी त्यांना दरोड्याच्या कामासाठी बोलावले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील ते दरोडेखोर नागपुरात आले होते. स्थानिक दरोडेखोरांच्या मदतीने ते नागपुरात दरोडा टाकण्याच्या किंवा संधी मिळताच श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करण्याच्या तयारीत होते. या अपहरणातून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा डाव असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. पुढील तपास नागपूर पोलिस करत आहेत.
ही बातमी वाचा: